Sourav Ganguly on Test Batting at No. 3: भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत २-२ अशी बरोबरी साधत दौरा संपवला. इंग्लंडने पहिला आणि चौथा सामना जिंकला तर भारताने दुसरा आणि पाचवा सामना जिंकत मालिका बरोबरीत सोडवली. शेवटच्या सामन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सामना रंगला. भारतीय संघाकडून गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केलीच, त्यासोबत भारताच्या फलंदाजांनीही दमदार कामगिरी केली. पण काही फलंदाजांना फारशा ठसा उमटवता आला नाही. विशेषत: भारतीय संघाला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी समाधानकारक पर्याय सापडलेला नाही. चेतेश्वर पुजारानंतर या जागेसाठी सातत्याने शोध सुरु आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत करूण नायर आणि साई सुदर्शन यांचा पर्याय चाचपडून पाहण्यात आला. काहींनी श्रेयस अय्यरचाही पर्याय सुचवला. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मात्र एका वेगळ्याच नावाचा पर्याय सुचवला आहे.
सौरव गांगुलीची पसंती कुणाला?
सौरव गांगुलीने भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकासाठी साई सुदर्शन, करुण नायर किंवा श्रेयस अय्यर यांच्यापेक्षाही एक वेगळेच नाव सुचवले आहे. सौरव गांगुलीच्या म्हणण्यानुसार, अभिमन्यू ईश्वरन याला संघात स्थान देण्यात यायला हवे. त्याला तिसऱ्या क्रमांकासाठी गांगुलीने पसंती दर्शवली आहे. "अभिमन्यू ईश्वरन अजून युवा आहे. त्याचे कमी वय संघासाठी फायद्याचे ठरू शकते. मला विश्वास आहे की, त्याला नक्कीच संधी दिली जाईल. यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा साऱ्यांनी धावा केल्या. फक्त तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला फारशा धावा करता आलेल्या नाहीत. कसोटीत तिसरा क्रमांक फलंदाजीच्या दृष्टीने थोडा नाजूक असतो. कदाचित अभिमन्यू ईश्वरनला संघात तिसऱ्या क्रमांकावर संधी देणे योग्य ठरेल," असे गांगुली म्हणाला.
अभिमन्यूला संधी मिळेल?
इंग्लंड दौऱ्यात करण नायरला ८ वर्षांनी कमबॅकची तर साई सुदर्शनला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. पण ३० महिन्यांपासून टीम इंडियासोबत फिरत असलेला अभिमन्यू ईश्वरन बाकावर बसल्याचे पाहायला मिळाले. त्याची टीम इंडियात वर्णी लागल्यापासून अनेक नव्या चेहऱ्यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केले, पण तो मात्र अजूनही पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. गंभीरने त्याला दिलासा दिला असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे.