Nitish Kumar Reddy Family Emotional Video: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डीने शतकी खेळी खेळून सर्वांची मने जिंकली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ सामन्यात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरला. नितीशची ही खेळी खूप खास आहे, जी येणारी अनेक वर्षे लक्षात राहील. त्याच वेळी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर कुटुंबीय नितीशला भेटले. त्यावेळी सारेच भावनिक झाल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ BCCI ने शेअर केला.
नितीश रेड्डीची भेट, भावनिक क्षण
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, नितीश रेड्डीचे कुटुंबीय हॉटेलमधील त्याच्या रूम बाहेर येतात आणि दरवाजा वाजवतात. दरवाजा उघडून तो बाहेर येताच सर्वप्रथम त्याची आई त्याला घट्ट मिठी मारते, त्याचा गोड पापा देते. त्यानंतर नितीशची बहीण तेजस्वीदेखील दादाला मिठी मारते. अखेर वडील त्याच्या कडकडून मिठी मारतात. त्यांना आपले आनंदाश्रू आवरता आले नाहीत. हा भावनिक क्षण बीसीसीआयने व्हिडीओचित्रण करून चाहत्यांपर्यंत पोहोचवला. "नितीश आज खूप चांगला खेळला. मला त्याचा अभिमान आहे. आम्ही खूप संघर्ष केला आहे. भारतीय संघाचेही आभार," असे त्याचे वडील व्हिडिओमध्ये म्हणाले. तर त्याची बहीण तेजस्वी रेड्डी म्हणाले, "नितीशसाठी हा प्रवास सोपा नव्हता. आम्ही सर्व खूप आनंदी आहोत. त्याने आम्हाला सांगितले होते की तो पराक्रम करेल, त्याने ते करून दाखवलं."
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारतीय फलंदाजांनी घोर निराशा केली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. केएल राहुल (२४) आणि विराट कोहली (३६) या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाली, पण त्यांना मोठ्या खेळी करण्यात अपयश आले. रिषभ पंत (२८) बेजबाबदार फटका खेळून झेलबाद झाला. रविंद्र जाडेजादेखील १७ धावांत माघारी परतला. पण रेड्डी आणि सुंदर या जोडीने भारताचा डाव सावरला. वॉशिंग्टन सुंदरने ५० धावांची खेळी केली. बुमराह आणि आकाश दीप शून्यावर बाद झाले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत सिराज २ धावांवर नाबाद राहिला. नितीश कुमार रेड्डीदेखील १०५ धावांवर नाबाद आहे. त्याने आतापर्यंत १० चौकार आणि १ षटकार मारला.