महिला प्रीमिअर लीग (Women's Premier League) स्पर्धेला सुरुवात होण्याआधी या स्पर्धेतील लोकप्रिय फ्रँचायझी संघ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यात बदल करण्यात आला आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेच्या एक दिवस आधी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या बदली खेळाडूची घोषणा केली आहे. एका बाजूला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघानं १९ वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियन छोरी पारुनिका सिसोदिया (Parunika Sisodia) आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. दुसरीकडे स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं नुझात परवीन (Nuzhat Parween) हिला आपल्या ताफ्यात घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
१९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघातील खेळाडूसाठी MI नं किती रुपये मोजले
१९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय पोरींनी कमालीची कामगिरी नोंदवत इतिहास रचला होता. पारूनिका ही नुकत्याच पार पडलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना दिसून आले होते. इंग्लंड विरुद्धच्या उंपात्य फेरीत २१ धावांत ३ विकेट्स घेणाऱ्या पारुनिकानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात ६ धावा खर्च करून दोन विकेट्स घेतल्या होत्या. या वर्ल्ड चॅम्पियन्स खेळाडूला मुंबई इंडियन्स संगाने १० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात जोडले आहे. ती पूजा वस्त्राकरची जागा घेईल. दुखापतीमुळे पूजा वस्त्राकरने महिला प्रीमिअर लीग २०२५ स्पर्धेतून माघार घेतली आहे.
RCB नं बदली खेळाडूसाठी मोजले ३० लाख रुपये
दुसरीकडे स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील गत विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या संघाने आशा सोभनाच्या जागी बदली खेळाडूच्या रुपात नुझहत परवीनची संघात निवड केली आहे. रेल्वेकडून खेळणाऱ्या विकेट किपर बॅटर परवीनने पाच टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ३० लाख या मूळ किंमतीसह ती आरसीबीच्या ताफ्यात सामील झाली आहे.