रोहित नाईक
उप-मुख्य उपसंपादक, मुंबई
१५ वर्षांचा युवा फलंदाज स्ट्राइक घेण्यास सज्ज... समोर गोलंदाजीसाठी उभा आहे तो जागतिक दर्जाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. जगातील भल्याभल्या फलंदाजांना पाणी पाजलेल्या बुमराहसमोर हा मुलगा कसा टिकणार, याकडेच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले. परंतु, या पोऱ्याने कोणाच्याही ध्यानीमनी नसताना बुमराहने टाकलेला पहिलाच चेंडू थेट स्टेडियममध्ये भिरकावून दिला आणि खणखणीत षटकाराने सर्वांना अवाक् केले. बिहारच्या वैभव सूर्यवंशी या शालेय मुलाने यंदाच्या आयपीएलमध्ये हा पराक्रम करून दाखवला आणि सर्वांनीच तोंडात बोटे घातली.
केवळ वैभवच नाही, तर अनेक युवा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंवर वरचढ ठरत यंदाच्या आयपीएलमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडले. अनुभवी खेळाडूंच्या सावलीत राहणारे हे ‘नवोदित’ आता ‘निर्णायक’ खेळाडू ठरत आहेत. आयपीएल नेहमीच युवा खेळाडूंना संधी देणारी स्पर्धा ठरली. अनेक संघांनी नवोदित आणि अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय स्तरावर न खेळलेले) खेळाडूंवर विश्वास दाखवला आणि या खेळाडूंनीही त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.
अंगक्रिश रघुवंशी (कोलकाता)
अंगक्रिशने १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघात मोलाचे योगदान दिल्यानंतर कोलकाताने त्याला आपल्या ताफ्यात घेतले. कोलकाता संघ यंदा गटांगळ्या खात असला, तरी अंगक्रिशने दमदार कामगिरी करत लक्ष वेधले आहे. देशांतर्गत स्पर्धेत मुंबईकडून खेळतानाही त्याने चुणूक दाखवली.
प्रफुल हिंगे (हैदराबाद)
विदर्भाचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे याने यंदाच्या आयपीएलमध्ये कहर करताना पदार्पणातच पहिल्याच षटकात तीन बळी घेण्याचा पराक्रम केला. त्याने राजस्थानच्या तगड्या फलंदाजीला सुरूंग लावले. अचूक टप्पा आणि वेगवान मारा यामुळे हिंगे प्रभावी ठरला.
प्रिन्स यादव (लखनौ)
दिल्लीच्या या वेगवान गोलंदाजाने यंदा लखनौकडून आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधले. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने प्रभावी स्पेल टाकत अनेक महत्त्वाचे बळी घेतले. वेग आणि अचूकतेमुळे तो मॅच-विनर ठरला.
आयुष म्हात्रे (चेन्नई)
मुंबईच्या या फलंदाजाने गेल्या वर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत थेट चेन्नई संघात प्रवेश मिळवला. आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर त्याने पहिल्याच वर्षी चेन्नईचा प्रमुख खेळाडू म्हणून स्थान कायम केले. यंदाही त्याने अनेकदा चेन्नईला वेगवान सुरूवात करून दिली. मात्र, हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने त्याला सहा सामने खेळल्यानंतर स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. परंतु, त्याची गुणवत्ता पाहता तो भविष्यात भारताचा प्रमुख फलंदाज ठरेल.
वैभव सूर्यवंशी (राजस्थान)
बिहारच्या या १५ वर्षीय स्फोटक फलंदाजाने राजस्थानकडून गेल्या वर्षी आयपीएल पदार्पण केल्यानंतर दुसरे सर्वात वेगवान शतक ठोकले. तो आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात कमी वयाचा खेळाडूही ठरला आहे. कमी वयातच त्याने आक्रमक फलंदाजी करत कमी सामन्यांतच वेगवान धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट २४० च्या आसपास राहिला असून तो पुढील सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे.
आयपीएलद्वारे मिळते तरुण खेळाडूंना अशी संधी
- जगातील सर्वोत्तम खेळाडूंसह खेळता येते
- दिग्गज खेळाडूंकडून शिकण्याची संधी
- राष्ट्रीय संघात प्रवेश मिळवण्याचा मार्ग
- लीगमुळे मिळणारे भक्कम आर्थिक पाठबळ
- दडपणाखाली खेळण्याचा मिळणारा अनुभव
- आधुनिक क्रिकेटशी होणारी ओळख