India vs South Africa Women's Cricket World Cup 2025 Final Live Streaming : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धेतील १३ व्या हंगामातील अंतिम सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहचला आहे. दुसरीकडे भारतीय संघ तिसऱ्या प्रयत्नात ICC ची पहिली वहिली स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील हा सामना ऐतिहासिक असाच आहे. कारण या स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया यांच्याशिवाय दोन वेगळे संघ एकमेकांविरुद्ध भिडताना पाहायला मिळणार आहे. इथं एक नजर टाकुयात कधी आणि कुठं पाहता येईल भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघातील अंतिम सामना? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड यासंदर्भात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुठं अन् कधी रंगणार अंतिम सामना
भारतीय महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील अंतिम सामना नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
IND-W विरुद्ध SA-W यांच्यातील जेतेपदाची लढत कशी पाहता येईल?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघातील अंतिम सामन्याचे थेट प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर उपलब्ध असेल. याशिवाय जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या मेगा फायनलचा आनंद घेऊ शकतात.
.
भारतीय संघ तिसऱ्या प्रयत्नात इतिहास रचण्याच्या इराद्याने उतरेल मैदानात
यंदाच्या हंगामाआधी भारतीय संघाने २००५ मध्ये पहिल्यांदा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन संघाने ९८ धावांनी फायनल बाजी मारत भारतीय महिला संघाच्या स्वप्नाचा चक्काचुरा केला होता. २०१७ मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा फायनल खेळला. पण यावेळी इंग्लंडचा संघ भारतीय महिला ब्रिगेडच्या स्वप्नाआड आला. यावेळी भारतीय संघाने अवघ्या नऊ धावांनी पहिली वहिली आयसीसी ट्रॉफी उंचावण्याची संधी गमावली होती. आता तिसऱ्या प्रयत्नात टीम इंडिया पहिल्यांदा ही स्पर्धा जिंकत इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
अंतिम सामन्यात ही गोष्ट ठरेल टीम इंडियाच्या जमेची बाजू
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात आतापर्यंत ३४ एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने २० वेळा बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फक्त १३ वेळा विजयाचा डाव साधला असून दोन्ही संघातील एक सामना अनिर्णित राहिला आहे. या आकडेवारीसह भारतीय संघाला घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा उठवता येईल.