लंडन - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला 0-5 असा पराभव पत्करावा लागला तरी आयसीसी कसोटी क्रमवारीतील त्यांचे अव्वल स्थान कायम राहणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत 2-0 अशा पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला (106) सहा गुण गमवावे लागले, परंतु त्यांनी क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले आहे. तिस-या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यातही 106 गुण आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 गुणांचा फरक आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत 5-0 असा पराभव पत्करल्यास भारताची गुणसंख्या आठने कमी होणार आहे. याचा अर्थ या मालिकेनंतर भारताच्या खात्यात 117 गुण राहतील. मात्र, इंग्लंड सात गुणांची कमाई करून दुस-या स्थानी झेप घेऊ शकतो. इंग्लंड सध्या 97 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.
मागील दोन इंग्लंड दौ-यात भारतीय संघाला अपयश आले होते. 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला अॅलेस्टर कुकच्या संघाने व्हाइटवॉश दिला होता. त्यामुळे भारताला कसोटीतील अव्वल स्थानही गमवावे लागले होते. 2014 मध्ये भारताने पहिला सामना अनिर्णीत राखला आणि दुसरा सामना जिंकला, परंतु कुकच्या संघाने जोरदार पुनरागमन करताना ही मालिका 3-1 अशी जिंकली.