भारतीय महिला संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक विजयासह महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गत विजेत्या ऑस्ट्रेलियानं  नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ३३८ धावा केल्या होत्या. पण सर्वाधिक वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला या धावासंख्येचा बचाव करता आला नाही. भारतीय महिला संघाने ९ चेंडू आणि ५ विकेट्स राखून दिमाखात फायनल गाठली. हरमनप्रीत कौरच्या ८९ धावांच्या खेळीसह जेमिमा रॉड्रिग्जच्या १२७ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विक्रमी विजय नोंदवत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकण्याच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. या विजयानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो. 
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
दिग्गज क्रिकेटर्संकडून भारतीय महिला संघावर कौतुकाचा वर्षाव
भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला क्रिकेटमध्ये अच्छे दिन आल्याची पहिली झलक या लढतीनंतर पाहायला मिळाली. भारताच्या ‘वुमन इन ब्लू’ च्या या दमदार कामगिरीनंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी महिला संघाच्या कामगिरीवर आपल्या भावना व्यक्त करत संघातील खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सचिन तेंडुलकर, युवराज सिंगसह क्रिकेटच्या मैदानातील दादा अर्थात सौरव गांगुली आणि  भारतीय पुरुष संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज ए. बी. डी. विलियर्स यांनी ऑस्ट्रेलियावरील या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी!
अप्रतिम विजय! शाब्बास जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर. तुम्ही दोघींनी संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजी श्री चरणी आणि दीप्तीनं कमाल केली. तिरंगा असाच उंचावत ठेवा, अशा आशयाच्या शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलरकनं भारतीय महिला संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.  
बलाढ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध धावांचा पाठलाग करताना मिळवलेला अविश्वसनीय विजय 
वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल रंगणार याचा आनंद व्यक्त करताना एबी डिव्हिलियर्सनं म्हटलंय की, भारतीय संघाने धावांचा पाठलाग करताना मिळवलेला विजय हा अविश्वसनिय आहे. सर्वात बलाढ्या प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाचा सिलसिला खंडीत केल्याबद्दल टीम इंडियाचं खूप अभिनंदन, अशा शब्दांत एबीनं भारतीय महिला संघाचे फायनलमध्ये स्वागत केले आहे.