India Head Coach Gautam Gambhir On His Future : भारतीय संघावर घरच्या मैदानताील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाइट वॉशची नामुष्की ओढावली. गुवाहाटी कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने पत्रकार परिषदेत येऊन पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना केला. न्यूझीलंडच्या संघानंतर दक्षिण आफ्रिकेनं घरच्या मैदानात टीम इंडियाला क्लीन स्वीप दिल्यावर भारतीय एका पत्रकाराने थेट गौतम गंभीरकडे बोट दाखवत त्याच्या भविष्यासंदर्भातच प्रश्न उपस्थितीत केला. यावर गंभीरनं BCCI कडे चेंडू टोलवत आपल्या मार्गदर्शनाखाली संघाने मिळवलेल्या यशाचा पाढा वाचून दाखवल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोचिंगच्या भविष्यासंदर्भातील प्रश्नावर गौतम गंभीरनं असा दिला रिप्लाय
गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये घरच्या मैदानात भारतीय सघाला १३ महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. याच अनुषंगाने एका पत्रकाराने गंभीरला थेट त्याच्या भविष्यासंदर्भातील प्रश्न विचारला. यावर गंभीर म्हणाला की, "माझ्या भविष्यासंदर्भादील निर्णय घेण्याचं काम हे बीसीसीआयचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, मी तोच माणूस आहे ज्याने इंग्लंडविरुद्धच्या दौऱ्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत यश मिळवून दिले आहे." गौतम गंभीरनं हा रिप्लाय देत लाजिरवाण्या पराभवानंतरही राजीनामा वैगेरे देण्याचा प्रश्नच येत नाही, अशी आपली भूमिका स्पष्ट केल्याचे दिसते. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. याशिवाय इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका २-२ अशी अनिर्णित राखली होती.
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
सगळ्यांसोबत मी दोषी आपणही जबाबदार असल्याचं मान्य केलं, पण...
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाला कोणाला एकाला जबाबदार धरता येणार नाही, असे म्हणत गंभीर म्हणाला की, "चूक सगळ्यांची आहे, त्याची सुरुवात माझ्यापासून होते. आपल्याला चांगलं खेळायला हवं होतं. ९५ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर १२२ चेंडूत ७ विकेट्स गमावणे ही स्थिती स्विकारण्याजोगी निश्चितच नाही. पण तुम्ही एखाद्या खेळाडूला दोषी ठरवू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय वेगवान आणि अत्यंत प्रतिभावान खेळाडूंची गरज नसते. मर्यादित कौशल्य असलेले पण मजबूत व्यक्तिमत्त्व असलेले खेळाडू लागतात. तेच उत्तम क्रिकेटर बनतात, असे म्हणत युवा संघाला थोडा वेळ द्या, असे म्हणत गंभीरनं पराभवामागे भारतीय कसोटीतील संक्रमाणाचा काळ लक्षात घ्या, यावर जोर दिला.
त्या पराभवाशी तुलना करू नका
याआधी घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध जो पराभव झाला त्या पराभवाशी दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पराभवाची तुलना करू नका. तो संघ आणि आताचा संघ यात जमीन आसमानचा फरक आहे. सध्याच्या संघात बॅटिंग ऑर्डरसह बॉलिंगमध्येही पूर्णपणे बदल झाला आहे. आतापर्यंत असं कधीच झालं नव्हते. त्यामुळे कसोटी संघाकडून अपेक्षित कामगिरीसाठी थोडा वेळ द्यावाच लागेल, असेही गंभीरनं म्हटले आहे. अश्विन हा काही एका रात्रीत स्टार झाला नव्हता, असे सांगत गंभीरनं वॉशिंग्टन सुंदरला संघात संधी देण्यावरही भाष्य केले.