India vs Zimbabwe 1st ODI Live । नवी दिल्ली : आजपासून भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यामधील एकदिवसीय मालिकेला सुरूवात होत आहे. के.एल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वात ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, भारतीय संघाने नाणेफेक जिंकून (India Won The Toss) यजमान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
भारताचा गोलंदाजी घेण्याचा निर्णय
भारतीय संघाचा कर्णधार के.एल राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावर म्हटले, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू कारण इथे विकेट चांगली दिसते आहे. त्यामुळे साहजिकच खेळपट्टीवर ओलावा असू शकतो. प्रथम गोलंदाजी करताना पहिल्या तासात प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल. काही युवा खेळाडूंना आजच्या सामन्यात संधी मिळाली आहे, त्यांच्या कौशल्यांना आव्हान देण्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. दीपक चाहर दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून लांब होता मात्र आजच्या सामन्यातून त्याचे पुनरागमन झाले आहे", असे राहुलने अधिक म्हटले.
राहुल आणि धवन असणार सलामीवीर
२७ ऑगस्टपासून रंगणाऱ्या आशिया चषक स्पर्धेपूर्वी राहुलसाठी झिम्बाब्वे दौरा रंगीत तालीम ठरेल. आशिया चषकामध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मासोबत राहुल सलामीला खेळणार असल्याने त्यादृष्टीने राहुलला झिम्बाब्वे दौऱ्यात सलामीला खेळविण्यात येण्याची दाट शक्यता आहे. आजच्या सामन्यात उपकर्णधार शिखर धवन आणि कर्णधार लोकेश राहुल हे सलामीवीर म्हणून दिसू शकतात.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
के.एल.राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.