India vs West Indies, 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्याच्या पूर्वसंध्येला यजमानांना आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन व मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि त्यामुळे ते आता अन्य सहकाऱ्यांसोबत सरावाला सुरूवात करू शकणार आहे. ANI नेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
''शिखर आणि श्रेयस यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते सरावाला सुरुवात करू शकतात. ऋतुराज अजूनही आयसोलेशनमध्ये आहे,''असे सूत्रांनी ANI ला सांगितले. भारतीय संघाचे आज सायंकाळी सराव सत्र होणार आहे आणि त्यात हे दोघंही सहभाग घेतील. पहिल्या वन डे सामन्याआधी शिखर, श्रेयस, ऋतुराज यांच्यासह नवदीप सैनी व अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर हे सर्व विलगीकरणात होते. नवदीपने कालच सरावाला सुरुवात केली होती. शिखर व श्रेयस यांना दुसऱ्या वन डे सामन्यात खेळता येणार नाही.
लोकेश राहुलचे पुनरागमन, दुसऱ्या वन डेतून आता 'या' खेळाडूचा होणार पत्ता कट
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना ९ तारखेला होणार आहे. लोकेश राहुलच्या अनुपस्थित आणि शिखर धवन व ऋतुराज गायकवाड यांना कोरोना झाल्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला मैदानावर उतरला. कर्णधार रोहित व इशान यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण, आता लोकेश राहुल परतला आहे. लोकेश व मयांक अग्रवाल यांचे नेट्समध्ये सराव करतानाचे फोटो BCCI ने पोस्ट केले आहेत.
दुसऱ्या वन डे सामन्यात इशान किशन किंवा दीपक हुडाला बाकावर बसवले जाऊ शकते. इशानने पहिल्या वन डे त २८ धावा करताना रोहितसह पहिल्या विकेटसाठी ८४ धावा जोडल्या होत्या. तर दीपकने नाबाद २६ धावांची खेळी करताना सूर्यकुमार यादवसह पाचव्या विकेटसाठी ६२+ धावा जोडून संघाचा विजय पक्का केला होता. या दोघांपैकी एकाला बाकावर बसवले जाऊ शकते. जर दीपक हुडाला बसवले तर इशान मधल्या फळीत खेळेल आणि रोहित व लोकेश सलामीला खेळतील.