भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात शुभमन गिलचा पुन्हा एकदा सपशेल अपयशी ठरला. शुभमन गिलवर 'गोल्डन डक' होण्याची वेळ आल्यावर पुन्हा एकदा संजू सॅमसन चर्चेत आला आहे. कारण आशिया कप स्पर्धेआधी अभिषेक शर्माच्या साथीनं भारताच्या डावाची सुरुवात करताना संजू सॅमसन याने ब्लॉकबस्टर शो देत टी-२० क्रिकेटमध्ये संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम दावेदार असल्याचे सिद्ध केले होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
शुभमन गिलला प्रमोशन अन् संजू सॅमसन झाला 'बळीचा बकरा'
सगळं काही सुरळीत चालू असताना टी-२० प्रकारात खेळवण्यात आलेल्या आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शुभमन गिल संघात आला. एवढेच नाहीतर उपकर्णधाराची जबाबदारी सोपवत त्याला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती देण्याचा निर्णय घेतला गेला. अभिषेक शर्माच्या हिट शोमुळे ही चूक झाकून गेली. दुसऱ्या बाजूला संजूला लोअर ऑर्डरला ढकलत हळूहळू त्याला बाकावर बसवण्यात आले. आता अभिषेक शर्माच्या पदरी अपयश आल्यावर पुन्हा एकदा शुभमन गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे. जो संघात हवा तो संजू डगआउटमध्ये आणि ज्याची टी-२० संघात जागाच होऊ शकत नाही तो शुभमन गिल वशीलेबाजीवर संघात आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागल्या आहेत.
तीन शतके ठोकून संजू बाकावर अन् धावांसाठी संघर्ष करणाऱ्याला प्रमोशनसह संधीवर संधी
आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये मागील १६ डावात शुभमन गिलच्या बॅटमधून एकही अर्धशतक आलेले नाही. यातील ८ डावात शुभमन गिलला १५ धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. याउलट संजू सॅमसन याने मागील १२ डावात ३ शतके झळकावली आहेत. ही आकडेवारी संजू सॅमसन हाच सलामीचा सर्वोत्तम पर्याय आहे, हा सिद्ध करणारी आहे. पण या आकडेवारीकडे दुर्लक्ष करून शुभमन गिलवर मर्जी बहाल करण्याचा खेळ सुरु आहे. संजूशिवाय यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराजच्या रुपात टीम इंडियाकडे सलामीची आणखी दोन सर्वोत्तम पर्याय आहेत. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघाकडे आता फक्त ८ सामने उरले आहेत. आता हळूहळू शुभमन गिलवरील दबावही वाढताना अगदी स्पष्ट दिसत आहे. आतातरी संघ व्यवस्थापनाला चूक कळणार का? संजूला न्याय देत टीम इंडियातील गंभीर मुद्दा निकाली लावण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार का? ते पाहण्याजोगे असेल.