दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाला ५१ धावांनी पराभूत करत पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात भारतीय संघावर घरच्या मैदानात सर्वाधिक धावांच्या फरकाने पराभवाची नामुष्की ओढावली. एवढेच नाही तर २१४ धावांचा पाठलाग करताना १६२ ऑलआउट झाल्यानंतर टीम इंडियाच्या नावे आणखी एका लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. अख्ख्या संघाला जलदगती गोलंदाजांनी गारद केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्मा सोडला तर कोणीच नाही लढला
दोनशे पार धावसंख्येचा पाठलाग करताना अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलनं डावाची सुरुवात केली. शुभमन गिलनं पहिल्याच चेंडूवर आपली विकेट गमावली. अभिषेक शर्मालाही यावेळी मोठा धमाका करण्यात अपयशी ठरला. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यालाही फलंदाजीत धमक दाखवता आली नाही. तिलक वर्माच्या अर्धशतकाशिवाय सर्वच फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले.
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
दक्षिण आफ्रिकेचा भेदक मारा! टीम इंडियावर पहिल्यांदाच आली ही वेळ
दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून ओतनेल बार्टमन याने ४ षटकात २४ धावा खर्च करत ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय लुंगी एनिगडी, मार्को यान्सेन आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. टी-२० मध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाने सर्वच्या सर्व १० विकेट्स जलदगती गोलंदाजांसमोर गमावल्या. याआधी २०२२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि टी २० वर्ल्ड कप २०२४ च्या हंगामात पाकिस्तानविरुद्ध भारताने प्रत्येकी ९-९ विकेट वेगवान गोलंदाजांना दिल्या होत्या.
१४ डिसेंबरला तिसरा सामना! भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातील चुका सुधारुन मैदानात उतरणार की,...
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना हिमाचल प्रदेशच्या धरमशाला मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघ सलामीवीराच्या रुपात शुभमन गिलसंदर्भात मोठा आणि धाडसी निर्णय घेणार का? फलंदाजीतल लवचिकता आणण्याचा प्रयोग थांबवून टीम इंडिया स्थिर बॅटिंग ऑर्डरसह मालिकेतील पकड मजबूत करण्यावर भर देणार का? हे पाहण्याजोगे असेल