Sourav Ganguly Gautam Gambhir Team India Loss, IND vs SA 1st Test: कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेकडून टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. फिरकी गोलंदाजी ही टीम इंडियाची ताकद राहिलेली नाही असे काहींचे मत आहे. तर फिरकीविरूद्ध भारतीय फलंदाजी कमकुवत झाल्याचे काहींचे म्हणणे दिसते. कोलकाता कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली आणि भारताचा ३० धावांनी पराभव झाला. त्यामुळे ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीबद्दलही प्रश्न उपस्थित झाले. याबाबत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माजी कर्णधार सौरव गांगुली याने रोखठोक उत्तरे दिली आणि भारतीय संघासह कोच गौतम गंभीरलाही थेट सल्ला दिला.
खेळपट्टीशी छेडछाड करू नका, फक्त खेळावर लक्ष द्या
"ईडन गार्डन्सची खेळपट्टी भारतीय संघाने जशी मागितली होती, तशीच दिली गेली. पण मला वाटते की भारतीय संघ व्यवस्थापनाने त्यांच्या घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी खेळपट्टीशी छेडछाड करणे थांबवावे. खेळपट्टी अशी असावी ज्यावर खेळ चांगला रंगेल आणि सामना रंगतदार होईल. याचाच अर्थ खेळपट्टी ही फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठीही पोषक असायला हवी. जर एखादी खेळपट्टी ३५० पेक्षा जास्त धावा करू देत असेल आणि गोलंदाजांना विकेट घेण्यासही प्रेरणा मिळत असेल तर ती चांगली खेळपट्टी मानतात," असे गांगुलीने कोच गंभीरचने नाव घेता सुनावले.
शमीला संघात घ्या, गंभीरने ऐकावं हीच अपेक्षा
"आशा आहे की गौतम गंभीर मी बोलतोय ते ऐकत असेल. गंभीरने खेळपट्टी बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्या गोलंदाजीच्या ताकदीवर अवलंबून राहायला हवे. संघात बुमराह आणि सिराज आहेत, जे चांगली गोलंदाजी करत आहेत. त्यांच्या जोडीला मोहम्मद शमीलाही संघात खेळवायला हवे, कारण त्याच्याकडे भारतासाठी सामने जिंकण्याची क्षमता आहे," असे म्हणत सौरव गांगुलीने संघनिवडीबाबत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.
गंभीर खेळपट्टीबद्दल काय बोलला होता?
कोलकाता कसोटीनंतर पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने सांगितले की, त्याला हवी तशीच खेळपट्टी मिळाली होती. तो म्हणाला की क्युरेटर खूप मदत करत होते. संघ चांगला खेळला नाही त्यामुळे हरला. १२४ धावांचा पाठलाग करता येणे शक्य होते, खेळपट्टीत काहीही चूक नव्हती. पण फलंदाजांनी निराशा केली, असे तो म्हणाला होता.