Tilak Varma Gautam Gambhir, Ind vs Eng 2nd T20 : तिलक वर्माच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची दुसरी टी२० जिंकली. प्रथम फलंदाजी करताना जोश बटलरच्या ४५ धावांच्या मदतीने इंग्लंडने ९ बाद १६५ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून तिलक वर्माने अखेरपर्यंत झुंज देत नाबाद ७२ धावांची खेळी केली. सुरुवातीला आक्रमक खेळणारा तिलक वर्मा शेवटच्या टप्प्यात काहीसा संयमी खेळताना दिसला. त्याच्या या खेळीचे सर्वत्रच कौतुक झाले. सामन्यानंतर बोलताना त्या खेळीमागे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिलेला कानमंत्र महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले.
काय होता गौतम गंभीरने दिलेला कानमंत्र?
"आजची खेळपट्टी काहीशी फसवी होती. काही वेळा चेंडू जोरात अंगावर यायचा, तर काही वेळा अतिशय संथ गतीने निघून जायचा. दुसऱ्या बाजूने आमच्या विकेट्सही पडत होत्या. अशा परिस्थितीत मला गौतम सरांनी दिलेला कानमंत्र आठवला. त्यांनी मला सांगितले होते की तुला सामना जिंकवायचा असेल तर परिस्थितीनुसार खेळावे लागेल. संघाने आधीच उजव्या-डाव्या हाताचे कॉम्बिनेशन खेळवायचा विचार पक्का केला होता. गोलंदाजांना लय मिळू द्यायची नाही हा त्यामागचा विचार होता. साऊथ आफ्रिकेत मी अशाच प्रकारच्या गोलंदाजांना यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी करताना पाहिले आहे आणि त्यांच्यासमोर खेळलोही आहे. त्यामुळे इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी मला फारसा फरक पडला नाही. पण परिस्थितीनुसार खेळण्याचा सल्लाच अखेर कामी आला आणि मी सामना जिंकवू शकलो," असे सामनावीर तिलक वर्मा म्हणाला.
तिलकने कसा जिंकवला सामना?
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोश बटलर (45) आणि जेमी स्मिथ (२६) यांनी थोडी झुंज दिल्यामुळे इंग्लंडने शंभरी गाठली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांमध्ये ब्रायडन कार्स याने १७ चेंडूत ३१ धावा करत इंग्लंडला १६५ पर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, ध्रुव जुरेल आणि हार्दिक पांड्या हे पाचही फलंदाज स्वस्तात माघारी परतले. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. तिलक वर्मा फटकेबाजी करत असताना वॉशिंग्टन सुंदर (२६) बाद झाला. त्यामुळे आपोआपच तिलक वर्मावर सामना जिंकवून देण्याची जबाबदारी आली. त्याने मग आक्रमक पवित्रा सोडत संयमी खेळ दाखवला. शेवटच्या षटकात भारताला ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. तेव्हा पहिल्या चेंडूवर २ धावा आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत तिलक वर्माने सामना जिंकवला.