Join us

सूर्यकुमार कर्णधार कसा? 'त्या' दोन खेळाडूंवर अन्याय का? सोशल मीडियावर चाहते संतापले...

ऑस्ट्रेलिया विरूद्ध २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी२० मालिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 09:03 IST

Open in App

Suryakumar Yadav, IND vs AUS : भारताची एकदिवसीय विश्वचषक मोहीम आता संपली. आता संघाच्या नजरा २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेवर आहेत. या मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर करण्यात आला आणि त्यावरून बराच गदारोळ सुरू झाला. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मालिकेसाठी सूर्यकुमार यादवची कर्णधार म्हणून निवड केली आहे. यामुळे चाहते संतप्त झाले असून सोशल मीडियावर आपला राग व्यक्त करताना दिसत आहेत.

सूर्यकुमार यादव हा नुकत्याच पार पडलेल्या वन डे विश्वचषक संघाचा भाग होता पण काही विशेष करू शकला नाही. त्याला पूर्ण स्पर्धेत एकही अर्धशतक ठोकता आले नाही. अंतिम सामन्यात त्याला त्याची उपयुक्तता दाखवण्याची पुरेपूर संधी होती, पण सूर्यकुमार त्यात अपयशी ठरला. यानंतरही निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवला असून त्याला टी२० संघाचे कर्णधार केल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. सूर्यकुमार हा टी-२० मधील सर्वोत्तम फलंदाज आहे. असे असले तरी सूर्यकुमारला कर्णधार करण्यात आलेले चाहत्यांना पसंत नाही. यावरून सोशल मीडियावर काही सवाल उपस्थित करण्यात आले आहेत, तसेच दोन खेळाडूंवर संघनिवडीत अन्याय झाल्याचेही बोलले जात आहे.

2 खेळाडूंवर अन्याय

सूर्यकुमारची कर्णधार म्हणून घोषणा होताच सोशल मीडियावर चर्चा रंगली. संजू सॅमसनचीही या संघात निवड न झाल्यामुळे चाहते संतापलेले दिसत. संजू सॅमसनची वेस्ट इंडिज दौऱ्यावर संघात निवड झाली होती. त्यानंतर तो आयर्लंड दौऱ्यावरही गेला होता पण यावेळी त्याची संघात निवड झाली नाही. त्यामुळे संजूचे चाहते प्रचंड संतापलेले दिसले. तसेच अक्षर पटेलला या संघात स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे त्याची वनडे विश्वचषक संघात निवड झाली नाही. पण पहिल्या तीन सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अक्षर पटेल हा अनुभवाने वरिष्ठ खेळाडू असतानाही ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार केल्याने काहींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, २३ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरूद्धची मालिका सुरू होणार असून या मालिकेत ५ सामने खेळले जाणार आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियासूर्यकुमार अशोक यादवअक्षर पटेलऋतुराज गायकवाडसंजू सॅमसन