IND vs AUS Shubman Gill suffers thumb injury Ahead Of 1st Test Vs Australia : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाच्या ताफ्यात दुखापतीच ग्रहण लागले आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरला पर्थच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघातील आणखी एक खेळाडूला दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे शुबमन गिल. या आधी लोकेश राहुल दुखापग्रस्त झाल्याची बातमी समोर आली होती. त्यात आता आणखी एका नावाची भर पडलीये.
शुबमन गिल पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार?
शुबमन गिल याला सराव सामन्यावेळी हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. स्पिमध्ये कॅच पकडताना चेंडूचा जबऱ्या मार बसल्यामुळे तो पहिल्या कसोटीला खेळणं मुश्किल वाटते, अशी माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने अद्याप त्याच्या दुखापतीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. जर तो सामन्याला मुकला तर टीम इंडियाचे टेन्शन आणखी वाढणार यात शंका नाही.
भारतीय ताफ्यातील खेळाडूंना दुखापतीच ग्रहण
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सरावाला सुरुवात केल्यावर भारतीय ताफ्यातील खेळाडूंना दुखापतीनं घेरल्याचे चित्र निर्माण झाले होते. लोकेश राहुलनं चेंडू लागल्यावर मैदान सोडल्याचा प्रकार घडला. सर्फराज खानही दुखापतीचा सामना करत आहे, अशी चर्चाही रंगली. एवढेच नाही तर विराट कोहली स्कॅनिंगसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचे वृत्तही ऑस्ट्रेलियान प्रसारमाध्यमांनी दिले होते. एका बाजूला या खेळाडूंची दुखापत किरकोळ असल्याच्या गोष्टीमुळे थोडासा दिलासा मिळत असताना स्टार बॅटरची दुखापत टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी आहे.
रोहितसंदर्भात संभ्रम त्यात शुबमनच्या दुखापतीच्या सस्पेन्सची भर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला रोहित शर्मा खेळणार की नाही यासंदर्भातही अजून प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शुबमन गिल हा एक सर्वोत्तम पर्याय मानला जात होता. दुसरीकडे दुसऱ्यांदा बाबा झाल्यावर रोहित शर्मा लवकरच संघाला जॉईन होऊन पहिली कसोटी खेळेल, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. पण कमी वेळात परिस्थितीशी जुळवून घेणं हे एक नव चॅलेंज असेल.