IND vs SA World Cup 2025 Final Weather Update: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका सज्ज होत आहेत. परंतु क्रिकेट रसिकांची धाकधूक फक्त सामन्याच्या निकालावर नाही, तर नवी मुंबईतील पावसाच्या शक्यतेवर आहे. २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बहुप्रतिक्षित फायनलवर हवामानाचे मोठे सावट आहे. यामुळे जर पाऊस झाला तर काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसामुळे खेळ होऊ शकला नाही तर?
पर्याय १: रिझर्व्ह डे: आयसीसी नियमानुसार, जर २ नोव्हेंबर रोजी किमान २०-२० षटकांचा खेळ शक्य झाला नाही, तर सामना सोमवार, ३ नोव्हेंबर या रिझर्व्ह डे वर हलवला जाईल.
पर्याय २: रिझर्व्ह डे देखील रद्द झाल्यास... जर रिझर्व्ह डे रोजीही पाऊस झाला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही (म्हणजे दोन्ही दिवसांत मिळून किमान २०-२० षटकांचा खेळ न झाल्यास), तर आयसीसीचा नियम अत्यंत स्पष्ट आहे: दोन्ही टीम्सना संयुक्त विजेते म्हणून घोषित केले जाईल.
यंदा प्रथमच महिला वर्ल्ड कप विजेतेपदासाठी लढणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियासाठी ही ऐतिहासिक संधी आहे. मात्र, जर पावसाने हा खेळ बिघडवला, तर दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागेल आणि कोणीही एकटे चॅम्पियन बनू शकणार नाही. यामुळे आयसीसीने जाहीर केलेली बक्षीसे देखील वाटून घेतली जाणार आहेत. २००२ मध्ये अशी परिस्थिती आली होती. आयसीसी मेन्स चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि श्रीलंकेला संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
हवामानाचा अंदाज...
नवी मुंबईत रविवारी ६३ टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळी ढगाळ तर दुपारनंतर उनाचा पाठशिवणीचा खेळ रंगणार आहे. अशातच पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुपारी ३ वाजता हा सामना सुरु होणार आहे.