ICC T20 World Cup 2026 NZ vs AFG 4th Match : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानला ५ विकेट्स राखून पराभूत केले आहे. ICC स्पर्धेत दमदार कामगिरीची रेकॉर्ड नावे असलेल्या न्यूझीलंडच्या संघाने मिचल सँटनरच्या नेतृत्वाखाली चेन्नईतील चेपॉकचं मैदानावर विक्रमी विजयाची नोंद केली आहे. राशिद खानच्या अफगाणिस्तानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना गुलबदीन नायबीच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर १८३ धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत कधीच एवढ्या धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता. पण यावेळी सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडनं विक्रमी विजयासह हा डाव साधला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गुलबदीनचं दमदार अर्धशतक
गुलबदीन नायबीच्या दमदार अर्धशतकाशिवाय ६३ (३५) रहमुल्लाह गुरबाझ २७ (२२), सेदीकुल्ला अटल २० (२४), दर्विश रसुली २० (१३) यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या मोबदल्यात १८२ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन याने सर्वाधिक २ तर मॅट हेन्री, डफी आणि रचिन रविंद्र यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
T20 World Cup 2026 : अफगाणिस्तानच्या Gulbadin Naib ची पॉवर! फिफ्टी मारल्यावर झाला 'बॉडीबिल्डर'
राशिद खानने ट्विस्ट आणले, पण चमत्कार नाही घडला
धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १४ धावांवर पहिल्या दोन विकेट्स गमावल्या. संघ अडचणीत असताना सलामीवीर टिम सिफर्ट आणि ग्लेन फिलिप्स जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ चेंडूत ७४ धावांची भागीदारी रचली. राशिद खान याने फिलिप्सला ४२ (२५) तंबूचा रस्दा दाखवत सामन्यात ट्विस्ट आणले. टीम सिफर्ट ४२ चेंडूत ६५ धावा करून परतल्यावर अफगाणिस्तान चमत्कार करेल, असे वाटत होते. पण मार्क चॅपमन २८ (१७) आणि डेरियल मिचेलनं २५ (१४)* आणि कर्णधार मिचेल सँटरननं ८ चेंडूत १७ धावा करत ५ विकेट्स आणि १३ चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानवर पहिल्यांदा आली ही वेळ
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात अफगाणिस्तानच्या संघाने १७५ पेक्षा अधिक धावा केल्यावर कधीच पराभवाचा सामना केला नव्हता. पण यावेळी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदाच त्यांच्यावर ही वेळ आली. आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध १५७ पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारा न्यूझीलंड पहिला संघ ठरला आहे.