ICC T20 Rankings : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिका गमावलेल्या भारतीय संघाची टी-२० मालिकेतील सुरुवातही पराभवाने झाली आहे. ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरल्यावर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. हा सामना जिंकत यजमान ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघाने टी-२० क्रमवारीत भारतीय संघाच्या रेटिंगमधील अंतर कमी केलं आहे.
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
टीम इंडिया अजूनही अव्वल, पण....
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदनं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर क्रमवारीत केलेल्या अपडेटनंतर भारतीय संघ अजूनही अव्वलस्थानी कायम आहे. पणमेलबर्न विजयामुळे ऑस्ट्रेलिया आता भारताच्या अवघ्या दोन रेटिंग पॉइंट्स अंतरावर आला आहे. टी-२० क्रमवारीत भारतीय संघ २७१ रेटिंगसह अव्वलस्थानी विराजमान आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघ  २६९ रेटिंग पॉइंट्स खात्यात जमा करून दुसऱ्या स्थानावर आहे. 
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
भारतीय संघासमोर मालिकेत कमबॅक करण्यासोबत नंबर वन स्थान टिकवण्याचं आव्हान
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील अजून ३ सामने बाकी आहेत. जर भारतीय संघाने आणखी एक सामना गमावला तर टी-२० क्रमवारीतील रेटिंग २७१ वरून २७० वर येईल. याउलट ऑस्ट्रेलिया एका रेटिंग पॉइंट्सच्या फायद्यासह भारताच्या बरोबरीनं २७० रेटिंगवर पोहचेल. या परिस्थितीतही भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहिल, पण पराभवाची मालिका कायम राहिली तर मात्र भारतीय संघावर नंबर वनचा ताज गमावण्याची वेळ येईल. आयसीसी क्रमवारीतील आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला पुढील दोन टी-२० सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकावा लागेल. जर दोन सामने गमावले तर मालिका तर हातून जाईलच, पण नंबर वनचा ताजही ऑस्ट्रेलियाकडे जाईल.
 टीम इंडिया अव्वलस्थान कायम राखण्यासह मालिका जिंकण्याचा डाव साधणार का? 
२०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर भारतीय संघात नेतृत्व बदल झाला. रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर पडली. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दिमाखदार कामगरी नोंदवल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय संघाने दुबईच्या मैदानात टी-२० प्रकारात खेळण्यात आलेली आशिया कप स्पर्धा जिंकली होती. उर्वरित सामन्यात भारतीय संघ जुने तेवर दाखवत दमदार कमबॅक करून अव्वलस्थानाचा धोका टाळण्यासोबत मालिका जिंकण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.