आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत शनिवारी अमेरिकेविरुद्ध झालेल्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाची चांगलीच दमछाक झाली. अमेरिकन गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे लढतीत भारताची फलंदाजी सपशेल कोलमडली होती. तसेच भारताचा डाव एकवेळ ६ बाद ७७ अशा बिकट स्थितीत सापडला होता. मात्र कर्णधार सूर्यकुमार यादव याने एक बाजू लावून धरत संघाला या संकटामधून बाहेर काढले होते. दरम्यान, सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव याने या खेळीमागचं गुपित उघड करताना सामन्यादरम्यान प्रशिक्षक गौतम गंभीरचा सल्ला मोलाचा ठरल्याचे सांगितले.
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितले की, ही खेळपट्टी १८०-१९० धावा होण्यासारखी नाही, तर १४० च्या आसपास धावा होती आहे, असं मला वाटलं. ब्रेकदरम्यान गौती भाईनेही मला हेच सांगितलं की, तू शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहा, धावा आपोआप होतील. मी मुंबईतील मैदानांवर अशा प्रकाररच्या खेळपट्ट्यांवर खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मी येथे फलंदाजी करू शकतो, असा मला विश्वास होता.
जेव्हा भारतीय संघ ६ बाद ७७ धावा अशा बिकट स्थितीत सापडला होता तेव्हा माझ्यावर खूप दबाव आला होता. मात्र मी शेवटपर्यंत खेळलो तर चित्र बदलू शकतं, असा मला विश्वास होता. डावातील सहाव्या षटकात फलंदाजीस आलेल्या सूर्यकुमारने बचावात्मक सुरुवात केली होती. तसेच पहिल्या १३ चेंडूत त्याने केवळ ७ धावा काढल्या होत्या मात्र नंतर फकटेबाजी करत सूर्यकुमार यादवने संघाला सुस्थितीत पोहोचवले.
या लढतीत सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाला २० षटकात ९ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारता आली होती. अखेरीस भारतीय संघाने हा सामना २९ धावांनी जिंकण्यात यश मिळवलं. तसेच सूर्यकुमार यादवची ही खेळी सामन्यात निर्णायक ठरली होती. तसेच या खेळीसाठी सूर्यकुमार यादव याला सामनावीराच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले.