Gautam Gambhir on Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय संघानं दिल्लीचं मैदान मारत वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका २-० अशी खिशात घातली. या मालिका विजयानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. रोहित आणि विराट २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता गौतम गंभीर यांनी यावर मोठं वक्तव्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित-विराटसंदर्भातील प्रश्न अन् गंभीरचं उत्तर
गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्यावर स्पष्ट भूमिका मांडली. पण विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? या प्रश्नावर त्यांनी थेट बोलणं टाळल्याचे दिसून आले. गौतम गंभीर म्हणाले की, वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला अजून दोन-अडीच वर्षे बाकी आहेत. त्याआधी दोघांसाठी ऑस्ट्रेलिया दौरा महत्त्वपूर्ण असेल. दोघेही सर्वोत्तम दर्जाचे फलंदाज असून ते आगामी दौरा गाजवतील, असा विश्वास गौतम गंभीर यांनी व्यक्त केला आहे.
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
याआधी शुबमन गिलनं बोलून दाखवली होती मनातली गोष्ट
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० पाठोपाठ वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ही जोडी फक्त वनडे क्रिकेटमध्येच दिसणार आहे. सध्याच्या घडीला वनडेचं प्रमाण खूपच कमी असल्यामुळे २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ते टीम इंडियाचा भाग असतील का? ही चर्चा रंगू लागली आहे. दिल्ली कसोटी सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वनडे संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने दोन्ही दिग्गज आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी उपयुक्त ठरतील, असे मत व्यक्त करत त्यांनी खेळावे, अशी गोष्ट बोलून दाखवली होती.
रोहित-विराट दोघांसमोर मोठं आव्हान
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील वनडे मालिकेआधी रोहित शर्माकडून भारतीय संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आले. आता कामगिरीत अभाव म्हणजे संघातून बाहेरचा रस्ता, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक सामना त्याच्यासाठी महत्त्वाचा असेल. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मा ४० तर विराट कोहली ३९ वर्षांचा होईल. पुढची अडीच वर्षे फिटनेस कायम ठेवत सातत्याने क्रिकेट खेळणं हे दोघांसमोरील मोठं आव्हान असेल. वेळप्रसंगी या जोडीला देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानातही उतरावे लागेल. जर या गोष्टीला नकार दिला तर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात टिकणं त्यांच्यासाठी मुश्किल होईल.