Join us

Duleep Trophy: ऋतुराजच्या कॅप्टन्सीसमोर श्रेयस ठरला फिका; तीन दिवसांत खेळ खल्लास!

Duleep Trophy 2024 : दुलिप करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' संघाने चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशीच विजय नोंदवला. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 16:43 IST

Open in App

Duleep Trophy 2024 : दुलिप करंडक स्पर्धेत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' संघाने चारदिवसीय सामन्यात तिसऱ्या दिवशीच विजय नोंदवला. त्यांनी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत 'ड' संघाला ४ विकेट राखून अगदी सहज पराभूत केले.

भारत 'ड' चा पहिला डाव १६४ धावांत गडबडला

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' संघाने सुरुवातीपासून मॅचवर आपली मजबूत पकड बनवली होती. नाणेफेक जिंकून ऋतुराजनं आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा निर्णय सार्थ ठरवत श्रेयस अय्यरच्या संघाचा पहिला डाव अवघ्या १६४ धावांत आटोपला.

 ऋतुराजच्या संघाची  अवस्थाही काही फार बरी नव्हती

भारत 'क' संघाने गोलंदाजीच्या जोरावर भारत 'ड' संघाला थोडक्यात आटोपले आहे असे वाटत होते. पण तेही फार काही कमाल करू शकले नाहीत. ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन,  रजत पाटीदार यांचा डाव फुसका ठरला. इंद्रजीतनं केलेल्या ७२ धावा आणि संघाच्या धावसंख्येत  अभिषेक पोरेलनं ३४ धावांची घातलेली भर या जोरावर भारत 'क' संघाने पहिल्या डावात १६८ धावांसह अवघ्या ४ धावांची आघाडी घेतली होती. 

दुसऱ्या डावात अय्यर-पडिक्कलची फिफ्टी

भारत 'ड' संघाचा कॅप्टन श्रेयस अय्यर याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले. पण मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात त्याने विकेट गमावली. त्याच्याशिवाय देवदत्त पडिक्कलच्या भात्यातूनही अर्धशतक पाहायला मिळाले. रिकी भूईनं ४४ धावांच योगदान दिले आणि दुसऱ्या डावात भारत 'ड' संघाने २३६ धावांपर्यंतत मजल मारली होती. पहिल्या डावातील ४ धावांच्या आघाडीमुळे भारत 'क' संघाला २३३ धावांचे टार्गेट मिळाले होते.

 दुसऱ्या डावात ऋतुराजसह या फलंदाजांनी अगदी तोऱ्यात बॅटिंग करत तिसऱ्या दिवशी संपवला सामना

 

धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात  ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी ६४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी रचली.  साई सुदर्शन २२ धावा काढून परतला. ऋतुराज गायकवाड ४६ (४८), आर्यन जुयाल ४७ (७४), रजत पाटीदार ४४ (७७) आणि अभिषेक पोरेल ३५(६३) महत्त्वपूर्ण खेळी करत ६ गडी आणि एक दिवस राखून टार्गेट पार केले.

या गोलंदाजाने फिरवला सामना

मानव सुथार याच्या गोलंदाजीमुळे श्रेयस अय्यरच्या संघ खरा गोत्यात आला. भारत 'क' च्या ताफ्यातून खेळणाऱ्या या अनकॅप्ड गोलंदाजाने पहिल्या डावात एक विकेट घेतली होती. पण दुसऱ्या डावात त्याने ७ निर्धाव षटकांसह ७ विकेट्स घेऊन अय्यरच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. तोच या सामन्याचा सामनावीर ठरला.

 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडश्रेयस अय्यरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ