Sarfaraz Khan Team India Test Squad, IND vs WI: वेस्ट इंडिज विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला. २ ते १४ ऑक्टोबरदरम्यान, भारतात २ सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. पहिला सामना अहमदाबादला तर दुसरा सामना दिल्लीत खेळला जाईल. रिषभ पंत दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेसाठी रविंद्र जाडेजा उपकर्णधार असणार आहे. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून कायम आहे. श्रेयस अय्यर आणि करुण नायर या दोघांनाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. तसेच, गेल्या काही महिन्यांपासून वजन केल्यामुळे चर्चेत असलेला सर्फराज खान यालाही संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याबद्दल बीसीसीआयकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजविरूद्ध जाहीर करण्यात आलेल्या संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे, भारतीय संघात सर्फराज खान याचा समावेश करण्यात आलेला नाही. काही महिन्यापूर्वी सर्फराज खान हा जाड असल्याच्या कारणावरून संघाबाहेर होता. त्यामुळे त्याने मधल्या काळात आपले वजन कमी केले. त्यामुळे आता विंडीज विरूद्धच्या मालिकेत सर्फराज खानला संधी मिळेल अशी आशा होती. पण ती आशा फोल ठरली. सर्फराज खानला संघात स्थान देण्यात आले नाही. याबाबत जेव्हा संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकरला विचारण्यात आले, तेव्हा त्याने उत्तर दिले की, "सर्फराज खान दुखापतग्रस्त आहे". त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेले नसल्याचे त्याने सांगितले.
करुण नायरलाही संधी नाहीच
करुण नायरची इंग्लंड दौऱ्यातील त्याची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती. त्यामुळे या मालिकेत स्थान मिळणार नाही अशी आधीच चर्चा होती आणि नेमके तसेच घडले. नायरला संघाबाहेर करण्यात आले. त्याच्याजागी देवदत्त पडिक्कला संघात स्थान मिळाले. तसेच, अक्षर पटेल देखील संघात परतला. इंग्लंड दौऱ्यासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते.
असा आहे भारताचा १५ खेळाडूंचा संघ- (Team India Test Squad)
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन. जगदीशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव