Australia vs India 5th Test Akash Deep Ruled Out Sydney Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना सिडनीच्या मैदानात रंगणार आहे. मालिकेत १-२ अशा पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाला या सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. कारण जलदगती गोलंदाज आकाशदीप दुखापतीमुळे पाचव्या आणि अखेरच्या कसोटीला मुकणार आहे. सिडनी कसोटी सामन्याआधी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याने यासंदर्भातील माहिती दिलीये.
पाठिच्या दुखापतीमुळे 'आउट' झाला आकाशदीप
जलदगती गोलंदाज आकाशदीप हा पाठिच्या दुखापतीनं त्रस्त आहे. त्यामुळे सिडनी कसोटी सामन्यात तो खेळणार नाही, अशी माहिती गौतम गंभीरनं पत्रकार परिषदेत दिली. गाबा कसोटी सामन्यात आकाशदीपनं बॅटिंगचीही खास झलक दाखवली होती. जसप्रीत बुमराहच्या साथीनं दमदार भागीदारी करत फॉलोऑनच संकट टाळताना त्याने ३१ धावांची खेळी केली होती.
२ सामन्यात ५ विकेट्स
आकाशदीप पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना दिसला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत दोन सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. यात त्याने ५ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. मेलबर्नच्या मैदानात त्याला दोन विकेट्स मिळाल्या. पण तो महागडाही ठरला होता.
कोण घेणार त्याची जागा?
सिडनी कसोटी सामन्यात या गोलंदाजाच्या रिप्लेसमेंटसाठी टीम इंडियाकडे प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा या दोन जलदगती गोलंदाजांचा पर्याय आहे. हर्षित राणाला पहिल्याच मॅचमध्ये संधी मिळाली. पण त्याला या सामन्यात प्रभावी मारा करता आला नव्हता. पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात त्याला आणखी एक संधी मिळणार की, प्रसिद्ध कृष्णाचा प्रयोग दिसणार ते पाहण्याजोगे असेल.