Join us

टीम इंडियानं मेलबर्नच्या मैदानातून वाहिली माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली

भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून उतरले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 05:57 IST

Open in App

Indian Players Wearing Black Armbands Honour Of Former Indian Prime Minister Manmohan Sing :  बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (शुक्रवारी) भारतीय संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.  मेलबर्नच्या मैदानात  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचा शोक व्यक्त करून खेळाडूंनी  त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी वयाच्या ९२ वर्षी निधन झाले. देशाच्या माजी पंतप्रधानांना  श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी काळी पट्टी बांधून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. प्रकृती खालावल्यामुळे  डॉ. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (२६ जानेवारी २०२४) रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली.  डॉ. मनमोहन सिंग हे  २००४ ते २०१४  या दशकभराच्या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. भारतीय अर्थव्यवस्थेला योग्य दिशा दाखवत देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यातही त्यांचे योगदान राहिले आहे. आर्थिक सल्लागार ते देशाचे पंतप्रधान या प्रवासात त्यांनी देशासाठी जे योगदान दिले आहेत ते अनमोल आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघडॉ. मनमोहन सिंगभारतआॅस्ट्रेलियाऑफ द फिल्ड