Asia Cup 2025 : युएईच्या मैदानात आशिया कप स्पर्धेचा १७ वा हंगाम पार पडणार आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने अबू धाबी आणि दुबईच्या मैदानात रंगणारी ही स्पर्धा यंदा टी-२० प्रकारात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला राहिला आहे. पण टी-२० फॉर्मेटमध्ये भारतीय संघाने फक्त एकदाच ही स्पर्धा जिंकली आहे. यंदाच्या हंगामात जेतेपद मिळवत सूर्युकमार यादवला MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. इथं जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिसऱ्यांदा टी-२० स्वरुपात रंगणार आशिया कप स्पर्धा
आशिया कपच्या आतापर्यंतच्या इतिहासात २०१६ मध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा टी-२० स्वरुपात खेळवण्यात आली होती. याशिवाय २०२२ नंतर आता तिसऱ्यांदा ही मोठी स्पर्धा छोट्या फॉर्मटमध्ये खेळवण्यात येणार आहे. ९ ते २८ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. जर टीम इंडियाने बाजी मारली तर सूर्यकुमार यादव हा धोनीनंतर टी-२० फॉर्मेटमध्ये ही स्पर्धा जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरेल.
Matthew Breetzke : आफ्रिकेच्या पठ्ठ्याची कमाल! २९० धावांसह वनडेत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
टीम इंडियाने धोनीच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये जिंकली होती स्पर्धा
२०१६ मध्ये टी-२० स्वरुपात खेळवण्यात आलेल्या पहिल्या आशिया कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात फायनल रंगली होती. महेंद्रसिंह धोनीच्या नेवृत्वाखालील भारतीय संघाने ८ विकेट्सने सामना जिंकत ही स्पर्धा जिंकली होती. या सामन्यात शिखर धवनने ६० तर विराट कोहलीनं ४१ धावांची खेळी केली होती. धोनीनं ६ चेंडूचा सामना करताना २० धावा कुटल्या होत्या.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या पदरी निराशा
२०२२ मध्ये दुसऱ्यांदा ही स्पर्धा टी-२० स्वरुपात खेळवण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत धमक दाखवू शकला नव्हता. या हंगामात दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने बाजी मारली होती. फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले होते. वनडे फॉर्मेटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०१८ आणि २०२३ मध्ये ही स्पर्धा जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.
पहिल्यांदाच आशिया कप स्पर्धेत कॅप्टन्सी करणार सूर्या
रोहित शर्मानं २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतल्यावर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर पडली आहे. द्विपक्षीय मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी दमदार राहिलीये. आशिया कप स्पर्धेत तो पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करणार असून तो आशिया कप स्पर्धेतील टी-२० प्रकारात ही स्पर्धा जिंकून धोनीची बरोबरी करण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.