Asia Cup India Squad Sunil Gavaskar On Jasprit Bumrah : इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत जसप्रीत बुमराह कोणत्या सामन्यात खेळणार? यावरुन चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. आता आशिया कप स्पर्धेसाठी त्याची टी-२० संघात वर्णी लागणार का? हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय. यावर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज कसोटीपटू सुनील गावसकरांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील BCCI निवड समितीला बुमराहसंदर्भात मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहसंदर्भात खूप चर्चा झाली, आता....
'मिड डे'साठी लिहिलेल्या स्तंभलेखात सुनील गावसकरांनी बुमराहसंदर्भात रोखठोक मत व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहसंदर्भात खूप चर्चा झालीये. क्रिकेटपेक्षा कोणताही खेळाडू मोठा नसतो. एका खेळाडूमुळं खेळ थांबत नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहला खेळवायचं की, नाही ते आताच ठरवा, अशा आशयाच्या शब्दांत गावसकरांनी स्टार जलगती गोलंदाजासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणं अपक्षित आहे, असे म्हटले आहे.
व्हाइट बॉल क्रिकेटमधून विश्रांतीच द्या, नेमकं काय म्हणाले गावसकर?
मर्यादित षटकांच्या द्विपक्षीय मालिकेच्या तुलनेत जसप्रीत बुमराहनं कसोटी मालिकेला प्राथमिकता द्यायला हवी. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र होणं महत्त्वाचं की, द्विपक्षीय मालिका महत्त्वाची यावर निवडकर्त्यांनी विचार करायला हवा. WTC च्या यंदाच्या हंगामात भारतीय संघाला सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तर जसप्रीत बुमराह हा संघाचा प्रमुख गोलंदाज असला पाहिजे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सर्व चार कसोटी सामने त्याने खेळायला हवेत.
आगरकर अँण्ड कंपनी गावसकरांचा सल्ला मनावर घेणार का?
हा प्लॅन साध्य करण्यासाठी व्हाइट बॉलमधून त्याला विश्रांती द्यायलाही हरकत नाही. मर्यादित षटकांच्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीचा फार फरक पडणार नाही, पण कसोटीत तो फरक जाणवू शकतो, अशा आशयाच्या शब्दांत त्यांनी निवड समितीला बुमराहाला व्हाइट बॉल क्रिकेटपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिलाय. आगरकर अँण्ड कंपनी त्यांचा हा सल्ला मनावर घेणार का? आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ त्याच्याशिवाय मैदानात उतरणार का? ते पाहण्याजोगे असेल.