Vaibhav Suryavanshi U19 World Cup: भारतीय युवा संघाने १९ वर्षाखालील वनडे विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत सहाव्यांदा U19 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४११ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर वैभव सूर्यवंशी याने १५ चौकार आणि १५ षटकारांच्या मदतीने ८० चेंडूत १७५ धावा कुटल्या होत्या. त्याच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा युवा संघ ३११ धावाच करू शकला. कॅलेब मॅथ्यू फॅल्कोनरने ११५ धावांची खेळी करत झुंज दिली, पण त्याची झुंज १०० धावांनी तोकडी पडली. अवघ्या १४ वर्षांचा असलेला वैभव सूर्यवंशी याला सामनावीर आणि स्पर्धेचा मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वैभव लहान असला तरीही तो आता पुन्हा या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. याला कारण बीसीसीआयचा एक नियम आहे.
काय आहे नियम?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) नियमांनुसार, कोणताही खेळाडू आपल्या कारकिर्दीत केवळ एकदाच १९ वर्षांखालील (U19) विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करू शकतो. जरी तो खेळाडू वयाच्या निकषात बसत असला आणि पुन्हा खेळण्यास पात्र असला, तरी नवीन प्रतिभेला संधी देण्यासाठी आणि 'वयचोरीच्या' (Age-fudging) प्रकारांना आळा घालण्यासाठी बीसीसीआयने हा कडक नियम बनवला आहे. दुसरीकडे, आयसीसीच्या नियमानुसार वयाची अट पूर्ण करणारे खेळाडू एकापेक्षा जास्त वेळा हा विश्वचषक खेळू शकतात, मात्र भारतीय खेळाडूंना त्यांच्या देशाच्या क्रिकेट बोर्डांच्या विशेष नियमाचे पालन करणे अनिवार्य असते. त्यामुळेच वैभव सूर्यवंशी आता परत अंडर-१९ विश्वचषक स्पर्धा खेळताना दिसणार नाही.
--
युवा ब्रिगेडचा एकच जल्लोष, व्हिडिओ व्हायरल
दरम्यन, विक्रमी विजयासह झिम्बाब्वेत तिरंगा फडकवल्यावर युवा टीम इंडियातील खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. आयुष म्हात्रे याने ट्रॉफी स्विकारल्यावर संघातील प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्पर्धेत एकही सामना न गमावता जेतेपद मिळवल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. कर्णधारासह संघातील खेळाडू ट्रॉफी उंचावून खास अंदाजात आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. अभिमानास्पद कामगिरीनंतरचा खास क्षण दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
---