India vs South Africa Match Tickets video: विराट कोहलीची दोन शतके, ऋतुराज गायकवाडचे वनडे कारकिर्दीतील पहिले शतक आणि सलग दोन मोठ्या धावसंख्येचे सामने यामुळे सध्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका चर्चेत आहे. दोन्ही सामन्यात शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगल्यामुळे या मालिकेबाबत उत्साह वाढला आहे. त्यातही सध्या मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. दोन्ही संघांचे चाहते तिसऱ्या सामन्याची वाट पाहत आहेत. त्यामुळे आगामी सामन्याच्या तिकिटांसाठी गर्दी झाली. पण या गर्दीत ओडिशातील कटकमध्ये घडण्याची शक्यता होती. पण सुदैवाने एक मोठी दुर्घटना टळली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर पाच टी२० सामने देखील खेळवले जाणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे स्टार खेळाडू अनुपस्थित असले तरी, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांची फटकेबाजी पाहण्यासाठी येणाऱ्यांमध्ये मालिकेचा उत्साह जोरदार आहे. जिथे जिथे सामने होत आहेत, तिथे तिकिटे मिळवण्यासाठी चाहते संघर्ष करताना दिसत आहेत. या मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबरला कटकमध्ये खेळवला जाणार आहे. तिकिटांची विक्री आज, ५ डिसेंबरला सुरू झाली. तिकिटे ऑनलाइन व्यतिरिक्त ऑफलाइन देखील विकली जात आहेत, यामुळे स्टेडियमबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली. त्यात मोठा गोंधळ, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये तिकीटासाठी लांब रांगा लागल्याचे दिसून आले, ज्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि मोठी दुर्घटना होणे टळले.
व्हिडिओंमध्ये दाखवलेल्या परिस्थितीमुळे अनर्थ होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसून येत होती. पण गर्दी आणि गोंधळ असूनही, कोणतीही दुर्घटना झाली नाही हे दिलासादायक आहे. यामुळे ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बेंगळुरूमध्ये RCBच्या जेतेपदाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. ते अजूनबी लोक विसरलेले नाहीत. त्याचदरम्यान, अशी परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष बीसीसीआयकडे आहे.