भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चाच नाही!
By विकास राऊत | Updated: April 3, 2024 13:20 IST2024-04-03T13:19:59+5:302024-04-03T13:20:56+5:30
मतदारसंघातील कार्यकर्ते जागा भाजपला सुटावी, अशी मागणी करत आहेत. पदाधिकाऱ्यांनी मुंबई, दिल्ली वाऱ्या केल्या आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चाच नाही!
छत्रपती संभाजीनगर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी घेतलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबाबत काहीही चर्चा झाली नाही. ६ एप्रिल, १४ एप्रिल रोजी पक्षाकडून करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन कसे करायचे, यावरच प्रदेशाध्यक्षांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.
मतदारसंघातील कार्यकर्ते जागा भाजपला सुटावी, अशी मागणी करत आहेत. पदाधिकाऱ्यांनी मुंबई, दिल्ली वाऱ्या केल्या आहेत. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी शहरप्रमुख, जिल्हाप्रमुखांसह नेत्यांवर जागा भाजपला सुटावी, यासाठी दबाव आणत आहेत. ही जागा शिंदे सेनेला सुटली तर संघटनेचे मनोधैर्य खचेल, अशी भावना अनेक जण रोज व्यक्त करत आहेत. तीन आठवड्यांपासून हा मतदारसंघ कोण लढवणार, यावरून भाजप आणि शिंदे गटात खल सुरू आहे. अद्याप निर्णय न झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते, पदाधिकारी सध्या हाताची घडी, तोंडावर बोट या अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत बावनकुळे हे बैठक घेणार असल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघ कुणाला सुटणार, याबाबत विचारणा करण्याची तयारी केली हाेती. परंतु प्रदेशाध्यक्षांनी कुणालाही बोलण्याची संधीच दिली नसल्याचे वृत्त आहे.
कार्यक्रमांच्या नियोजनाची बैठक
६ एप्रिल भाजप स्थापना दिन आणि १४ एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियाेजन कसे असावे, यासाठी आजची बैठक होती. या व्यतिरिक्त बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही.
-शिरीष बोराळकर, शहराध्यक्ष भाजप