...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:32 PM2024-05-06T16:32:33+5:302024-05-06T16:34:41+5:30

काहींचा मनापासून तर काहींचा धनासाठी प्रचार, आठवडी बाजारात रद्दीत आढळली उमेदवाराची माहितीपत्रके

Independent candidate brochures sold as junk; Some preach from heart and some for money | ...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी

...पठ्ठ्याने रद्दीत विकली उमेदवाराची माहितीपत्रके, प्रचारात निष्ठावंत कार्यकर्त्यांची कमी

गंगापूर : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम चालू असून प्रचाराने जोर धरला आहे. शनिवारी (दि.४) कार्यकर्त्यांना तर प्रचंड महत्त्व आले असून त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच काहींनी भाडोत्री कार्यकर्ते ठेवले असून त्यात काही जण मनापासून, तर काही धनासाठी प्रचार करीत असल्याचे दिसत आहे. असेच एका अपक्ष उमेदवाराने कार्यकर्त्यांना वाटण्यासाठी दिलेला प्रसिद्धीपत्रकांचा गठ्ठा त्या पठ्ठ्याने सरळ रद्दी म्हणून एका दुकानदाराला विकून पैसे कमावल्याचे दिसून आले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी येत्या १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे काही दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर धरला असून उमेदवारांच्या वतीने गर्दीच्या ठिकाणी माहिती पत्रक वाटून प्रचार केला जात आहे. पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते हे रॅली, कॉर्नर बैठका घेऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. मात्र, अपक्ष उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची फळी नसल्याने त्यांच्याकडून रोजंदारीवर तरुणांना घेऊन प्रचार केला जात आहे. यामुळे काही काळापुरता का होईना बेरोजगार तरुणांना रणरणत्या उन्हात दिवसभर गावागावांत फिरून खाऊन-पिऊन चांगला रोजगार मिळत आहे. यात्रा, उत्सव, आठवडी बाजार अशा आयत्या होणाऱ्या गर्दीच्या ठिकाणी उमेदवाराची माहिती असलेले पत्रक वाटली जात आहेत. 

शनिवारी गंगापूरच्या आठवडी बाजारात छत्रपती संभाजीनगर शहरातून रोजंदारीवर आलेले एका अपक्ष उमेदवारांचे प्रतिनिधी हे प्रचार करताना दिसून आले. प्रचारातील तरुण वेगवेगळ्या ठिकाणी पत्रक वाटून उमेदवाराचा प्रचार करीत होते. यातील एक तरुण शनिवारच्या आठवडी बाजारात माहितीपत्रक नागरिकांना वाटत होता. तेवढ्यात एका दुकानदाराची रद्दी संपल्याने त्याने सदरील माहिती पत्रकांचा गठ्ठा विकणार का, असा प्रश्न त्या रोजंदारी कार्यकर्त्याला विचारला. त्यानेही क्षणात हाेकार देऊन इतर सहकारी आजूबाजूला नसल्याची खात्री करून त्या दुकानदाराला संपूर्ण गठ्ठा विकून रोख पैसे घेतले. यात उन्हातान्हात फिरण्याचा ताणही मिटला, तसेच दुहेरी पैसे मिळाल्याचा आनंद त्या भाडोत्री कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर पसरला होता.

Web Title: Independent candidate brochures sold as junk; Some preach from heart and some for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.