काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच; संजय शिरसाट यांचा दावा

By बापू सोळुंके | Published: March 24, 2024 05:28 PM2024-03-24T17:28:25+5:302024-03-24T17:29:09+5:30

'होळीला संजय राऊतांच्या नावाने बोंबा मारणार.'

Aurangabad Lok Sabha Constituency is ours, said mla Sanjay Shirsat | काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच; संजय शिरसाट यांचा दावा

काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच; संजय शिरसाट यांचा दावा

बापू सोळुंके/ छत्रपती संभाजीनगर:औरंगाबाद लोकसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाकडून दावा केला जात आहे. मात्र हा आमच्या पक्षाचा बालेकिल्ला असल्याने काहीही झाले तरी औरंगाबाद लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच राहिल आणि आमचाच उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट)प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

आ. शिरसाट म्हणाले की, महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या जागा वाटप जवळपास झाले आहे. मंगळवारी महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. एकीकडे महायुती भक्कम समोर येत असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडी राहिल की नाही, असे चित्र असल्याचे आ.शिरसाट म्हणाले. वंचीत बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा सतत अपमान होत असल्याने ते महाविकास आघाडीसोबत राहणार नसल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते.

काल तसेच झाले आणि त्यांनी युती तोडण्याची घोषणा केल्याचे आ. शिरसाट म्हणाले. शिवसेनेतील काही नेते शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेतून कायम आदेश देतात, यामुळे लोक दुखावल्याने त्यांच्यापासून दूर जात असल्याची टिका आ. शिरसाट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 'सुंभ जळाले पण पीळ कायम'अशी त्यांची अवस्था असल्याचे ते म्हणाले. आ. विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक लढविण्याची घोषणा केली, याकडे कसे पाहता, शिवतारे हे जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत त्यांना युतीधर्म पाळावा लागणार असल्याचे आ. शिरसाट म्हणाले.

होळीला राऊतांच्या नावानेच बोंबा
होळीला कोणाच्या नावाने बोंम्बा मारणार या प्रश्नाचे उत्तर देताना आ.शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे तर ३६५ दिवस बोंबा मारत असतात. म्हणूनच त्यांचे नाव भोंगा पडले आहे. शिमगा आणि होळीच्या निमित्ताने शिव्या देणे ही आपली संस्कृती आहे आणि लोक ज्यांना कंटाळले आहेत त्यांच्याच नावाने बोंबा मारणार असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

Web Title: Aurangabad Lok Sabha Constituency is ours, said mla Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.