उद्धवसेना-वंचित ठरणार किंगमेकर ! कुणाला देणार पाठिंबा? काँग्रेस की भाजप, महापौर कुणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 15:14 IST2026-01-27T15:12:05+5:302026-01-27T15:14:46+5:30
Chandrapur : ६६ सदस्यीय चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वरवर शांत झाल्याचे भासत आहे.

Uddhav Sena- Vanchit will be Kingmaker ! Who will support? Congress or BJP, whose mayor?
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ६६ सदस्यीय चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसमधील अंतर्गत वाद वरवर शांत झाल्याचे भासत आहे. मात्र, वाद पूर्णतः मिटलेला नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे भाजपनेही अद्याप आपला गट स्थापन न केल्याने महापौरपदाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे.
दरम्यान, उद्धवसेना-वंचित आघाडी आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी तयार केलेल्या दहा सदस्यीय गटाने रविवारी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर महापालिकेतील राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली असून, महापौरपद उद्धवसेनेकडे यावे, यावर भर देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर भाजपच्या काही नगरसेवकांनीही मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
संख्याबळामुळे छोटे गट निर्णायक
संख्याबळाचा विचार करता काँग्रेस किंवा भाजप यांना सत्ता स्थापन करण्यासाठी उद्धवसेना-वंचित आघाडी व अपक्षांचा पाठिंबा अनिवार्य आहे. त्यामुळे हे गट 'किंगमेकर'च्या भूमिकेत आहे. परिणामी, महापौर नेमका कोणत्या पक्षाचा होणार, याबाबत सध्या केवळ चर्चाच सुरू आहेत.
मंगळवारी भाजप गटनेत्याची निवड ?
महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी लागूनही भाजपने अद्याप गटनेता निवडलेला नाही. मंगळवारी नागपूर येथे गटनेत्याची निवड होण्याची शक्यता असून, प्रदेश कार्यालयाने दोन नावांची शिफारस मागितल्याची माहिती मिळाली आहे.
महापौरपदावरूनच कोंडी; ठोस चर्चा रखडली
उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे हे महापौरपदासाठी आग्रही असून, जो पक्ष महापौरपद देईल, त्यांनाच आपल्या गटाचा पाठिंबा असेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली आहे. त्यामुळे काँग्रेस वा भाजप यांच्यासोबत अद्याप कोणतीही ठोस चर्चा पुढे सरकलेली नाही. महापौरपदावरूनच सत्तास्थापनेची संपूर्ण प्रक्रिया अडकल्याचे चित्र आहे.
भाजपमध्येही अंतर्गत मतभेद ?
- काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही गटनेता निवडीवरून अंतर्गत मतभेद असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी मुंबईत प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली.
- मंगळवारी नागपूर येथे भाजप आपला गट स्थापन करण्याची शक्यता असून, यासाठी प्रदेश कार्यालयाकडून दोन नावांची शिफारस पाठवावी अशी माहिती आहे.
- यामध्ये सुधीर मुनगंटीवार समर्थक माजी महापौर राहुल पावडे आणि आमदार किशोर जोरगेवार समर्थक सुभाष कासनगोडूवार यांची नावे चर्चेत आहेत.
- मात्र, अंतिम निर्णयाबाबत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळली जात आहे. दुसरीकडे भाजपचे काही नगरसेवक चंद्रपूरमध्येच होते. त्यामुळे चर्चा अधिकच रंगताना दिसली.