The result shocked some of the attendees and some of the novices | निकालाने काही प्रस्थापितांना तर काही नवख्यांना दिला धक्का
निकालाने काही प्रस्थापितांना तर काही नवख्यांना दिला धक्का

ठळक मुद्देपक्षापेक्षा उमेदवाराचा विचार : मतदारांनी विकासकामांना दिली पुन्हा संधी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणूक पार पडली. निकालही घोषित झाला. या निकालात काही प्रस्थापितांना तर काही पुन्हा नव्या जोमाने रिंगणात उतरलेल्यांना जबर फटका बसला. राजकीय सारीपाटावरील हा खेळ खेळताना कोण कुठे चुकला, याचे चिंतन आता राजकीय नेत्यांमध्ये सुरू झाले आहे. मतदारांनी तर आपला कौल दिला, आता अशाच चिंतनातून पराभुत राजकीय नेत्यांना पुढचे समीकरण ठरवावे लागणार आहे.
बल्लारपूर विधानसभा निवडणुकीच्या निकाल बघितल्यास या ठिकाणी मतदारांच्या मानसिकतेत फारसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. सुधीर मुनगंटीवारांवरील मतदारांचा विश्वास तिसऱ्या खेपेलाही कायम असल्याचे दिसून आले. विद्यमान मंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदार संघ व संपूर्ण जिल्ह्यातच केलेली विकासकामे यामुळे जनतेच्या विश्वासास ते पुन्हा एकदा पात्र ठरले आणि त्यांना या क्षेत्रात विजयाची हॅटट्रीक साधता आली. तर आतापर्यंत सलग सहावेळा जिंकण्याचा नवा विक्रमही जिल्ह्यात प्रस्थापित केला आहे.
ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून विरोधी पक्ष नेते व विद्यमान आमदार असलेले विजय वडेट्टीवारच काँग्रेसकडून रिंगणात होते. महायुतीतून शिवसेनेला ही जागा देण्यात आली. सावली तालुक्यातील रहिवासी व राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावर असलेल्या संदीप गड्डमवार यांना शिवसेनेने शिवबंधन बांधत उमेदवारी दिली. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली. गड्डमवार हे राष्टÑवादीतून आणलेले ‘पार्सल उमेदवार’, असाच समज कार्यकर्त्यांमध्ये होता. त्या तुलनेत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय वडेट्टीवार यांची कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. दांडगा जनसंपर्क आणि धावून येणारा नेता, अशी ओळख असल्यामुळे त्यांच्या विजय निश्चित होता. निकालानंतर ते दिसूनच आले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील निकालाने प्रमुख राजकीय पक्षांना जबर धक्का दिला आहे. चंद्रपूर मतदार संघ हा बºयापैकी सुशिक्षित व शहरी भाग समजला जातो. येथील मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना दूर सारून एका अपक्ष उमेदवारांवर विश्वास दर्शविला. सत्ता स्थापनेत पक्ष महत्त्वाचा आहे आणि विकासकामासाठी सत्ता महत्त्वाची आहे. असे असतानाही चंद्रपूर क्षेत्रातील सुज्ञ नागरिकांनी राजकीय पक्षांना दूर लोटले आणि ५६ वर्षानंतर पुन्हा एकदा आमदारकीची माळ किशोर जोरगेवार या अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात घातली.
यंदाच्या निकालात वरोरा विधानसभा क्षेत्राचा विचार केला तर थोड्याफार फरकाने चंद्रपूरसारखाच प्रकार घडल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीत बाळू धानोरकर हे शिवसेनेच्या तिकीटावरून निवडून आले होते. या निवडणुकीत शिवसेनेने हीच जागा मागितली आणि माजी मंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी दिली. या ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही जागा निघेल, असे पक्षाचे समीकरण होते. मात्र संजय देवतळे यांची राजकीय अस्थिरता त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. संजय देवतळे हे काँग्रेस शासनाचे मंत्री होते. त्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढली. यात ते पराभूत झाले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला व निवडणूक लढली. यात ते पुन्हा पराभुत झाले. आता २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा तिकीटासाठी शिवसेनेत प्रवेश केला. वारंवार तिकीटासाठी त्यांनी दाखवलेली अशी अस्थिरता मतदारांचा विश्वास जिंकू शकली नाही. मतदारांनी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना संधी दिली.
चिमूर विधानसभा क्षेत्र तसा काँग्रेसचाच बालेकिल्ला. विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने शिवसेनेने आणि कीर्तीकुमार भांगडिया यांच्या रुपाने भाजपने या बालेकिल्ल्याला खिंडार पाडली. कीर्तीकुमार भांगडिया हे विद्यमान आमदार असल्याने त्यांनी या क्षेत्रात बरीच विकासकामे केली. यंदाही भाजपकडून ते रिंगणात असल्याने त्यांच्या पाठिशी जनाधार असणे स्वाभाविक आहे. दुसरीकडे यंदा काँग्रेसने माजी आमदार अविनाश वारजुकर यांचे लहान बंधू डॉ. सतीश वारजुकर यांना उमेदवारी दिली. सतीश वारजुकर यांनी आजवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या. विधानसभेसाठी त्यांचा राजकीय अनुभव तोकडा आहे. क्षेत्राच्या तुलनेत लागणारी राजकीय परिपक्वता ते आत्मसात करू शकले नाही. त्यामुळे विशिष्ट क्षेत्रातील जनाधारच त्यांच्यासोबत राहिला. परिणामी त्यांना पराभूत व्हावे लागले.
राजुरा विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने माजी आमदार सुभाष धोटे यांना उमेदवारी दिली तर भाजपकडून पुन्हा विद्यमान आमदार अ‍ॅड. संजय धोटेच रिंगणात होते. २०१४ मध्ये देशभर मोदी लाट होती. या लाटेमुळे अ‍ॅड. संजय धोटे विजयी झाले. मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखविला.
मात्र हा विश्वास ते कायम टिकवून ठेऊ शकले नाही. त्या तुलनेत सुभाष धोटे यांनी मागील अनेक वर्षांपासून पक्षसंघटन करीत कार्यकर्त्यांची फळी तयार केली. तळागाळातील लोकांपर्यंत त्यांनी संपर्क ठेवत विविध समस्यांसाठी लढा देत राहिले. त्यामुळे यावेळी मतदारांनी विजयाची माळ अ‍ॅड. संजय धोटे यांच्या गळ्यातून काढून काँग्रेसचे सुभाष धोटे यांच्या गळ्यात घातली.

नवनिर्वाचित आमदारांचा पहिला दिवस
विधानसभा निवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. सहा विधानसभेचे शिलेदार ठरले. या सहाही नवनिर्वाचित आमदारांचा पहिला दिवस जनसंपर्क, नागरिकांच्या भेटीगाठीत गेला. काही विजयी मिरवणुकीत व्यस्त राहिले. बल्लारपूर विधानसभेचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे गुरुवारी विजयी मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर रात्रीच पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुंबईला रवाना झाले. पहिल्या दिवशी ते बैठकीतच व्यस्त राहिले. चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया हे आपल्या नव्या ईनिंगच्या पहिल्या दिवशी नागपूरला रवाना झाले. नागपूर येथे आयोजित एका समाजाच्या मेळाव्यात ते सहभागी झाले.
ब्रह्मपुरी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज पहिल्या दिवशी नागरिकांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर ते काँग्रेस पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आपला पहिला दिवस नागरिकांच्या भेटीगाठीत घालवला. यादरम्यान, त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना त्या संदर्भात निर्देश देऊन समस्यांचे निराकरण करण्यास सांगितले. वरोºयाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पहिल्या दिवशी मतदारांच्या भेटी घेतल्या. त्यांचे स्वागत स्वीकारले व वरिष्ठांचा आशीर्वाद घेतला. राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी पहिल्या दिवशी राजुºयाचे आराध्यदैवत भवानी मातेचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या मूळ गावी खिर्डी येथील हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले व गावकऱ्यांच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहिले. त्यानंतर विजयी मिरवणुकीत ते व्यस्त होते.

Web Title: The result shocked some of the attendees and some of the novices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.