Iran Stock Market: अमेरिका आणि इस्रायलच्या भीषण हल्ल्यानंतर तब्बल ८० दिवस बंद असलेला इराणचाशेअर बाजार आज(१९ मे) पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. इराणीशेअर बाजाराच्या इतिहासात एवढ्या मोठ्या कालावधीसाठी बाजारातील व्यवहार ठप्प राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले केल्यानंतर २८ फेब्रुवारी २०२६ रोजी 'तेहरान स्टॉक एक्सचेंज' अधिकृतपणे बंद करण्यात आले होते. त्या काळात गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली भीती, लाखो लहान गुंतवणूकदारांचे आर्थिक नुकसान टाळणे आणि युद्धजन्य परिस्थितीत वित्तीय बाजार स्थिर ठेवण्यासाठी हा बाजार तडकाफडकी बंद करण्यात आला होता.
बाजाराची वेळ १ तासाने वाढवली
इराणमधील शेअर बाजाराचे व्यवहार आता हळूहळू पूर्वपदावर आणले जात आहेत. या आठवड्याअखेर शेअर्स, इक्विटी फंड्स आणि डेरिव्हेटिव्ह्जमधील ट्रेडिंग पूर्णपणे सुरू होईल. भारतीय वेळेनुसार इराणचा शेअर बाजार सकाळी ११:०० ते दुपारी २:३० वाजेपर्यंत सुरू असतो. मात्र, युद्धाच्या काळात कंपन्यांचे किती नुकसान झाले आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, याची माहिती जाहीर करण्यासाठी कंपन्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. यामुळेच पहिल्या टप्प्यात ट्रेडिंगची वेळ १ तासाने वाढवण्यात आली आहे.
जागतिक बाजारावर काय होणार परिणाम?
इराणमधील शेअर बाजार पुन्हा सुरू होणे हा मध्य पूर्व आशियातील तणाव हळूहळू कमी होत असल्याचा संकेत मानला जात आहे. मात्र, आता जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' या सागरी मार्गाकडे लागले आहे. या मार्गावरून कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा पुरवठा पूर्ववत होतो की नाही, यावर बरेच काही अवलंबून आहे. कारण, याच सागरी मार्गावरून जगातील २० टक्क्यांहून अधिक ऊर्जेचा पुरवठा केला जातो.
भारतीय शेअर बाजाराची धाकधूक वाढली!
इराणचा बाजार सुरू झाला असला तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चड्या राहिल्या, तर त्याचा भारताला मोठा फटका बसू शकतो. कच्चे तेल महागल्यास भारताची 'चालू खात्यातील तूट' वाढेल. यामुळे देशात पेट्रोल-डीझेल आणखी महाग होऊन महागाई वाढण्याचा धोका आहे, जे भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक मानले जाते.
