Gold Silver Rate Today: देशांतर्गत कमोडिटी बाजार म्हणजेच एमसीएक्स (MCX) वर मंगळवार, १२ मे २०२६ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५४,१७२ रुपयांवर पोहोचला असून, चांदीनं प्रति किलो २,८२,५५९ रुपयांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, कालच सरकारी सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की सरकार सोने-चांदीच्या आयातीवर कोणतंही नवीन शुल्क लावण्याच्या विचारात नाही, तरीही बाजारपेठेत प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे.
आयात शुल्काबाबत सरकारचं स्पष्टीकरण
वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार सध्या सोने किंवा चांदीवर कोणत्याही प्रकारचे आयात शुल्क वाढवणार नाही. कच्चे तेल महागल्यामुळे परकीय चलनावर ताण पडू नये म्हणून सरकार आयातीवर निर्बंध आणेल किंवा शुल्क वाढवेल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. या आवाहनामुळे आयात शुल्काबाबतच्या अफवांना बळ मिळालं होतं, मात्र सध्या असे कोणतेही निर्बंध लादले जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय.
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी उसळी
चांदीच्या किमतीत सोमवारीही सुमारे ८,००० रुपयांची मोठी वाढ झाली होती. सोमवारी सोन्याचा भाव १,५३,७५० रुपये आणि चांदीचा भाव २,७८,२७४ रुपयांवर बंद झाला होता. जागतिक बाजारपेठेतही आज मोठी तेजी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दोन दिवसीय चीन भेट हे या तेजीमागचे मुख्य कारण असल्याचं सांगितले जात आहे.
चांदीचे दर काय?
दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू आणि भोपाळ या शहरांमध्ये १ किलो चांदीचा दर २,९०,००० रुपयांवर पोहोचला आहे. तर चेन्नईत चांदीची किंमत २,९०,००० रुपये इतकी झालीये. गेल्या दोन दिवसांतील ही वेगवान दरवाढ पाहता, लवकरच देशांतर्गत बाजारात चांदीचा भाव ३,००,००० रुपयांच्या पार जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जागतिक राजकीय घडामोडी आणि अमेरिकेच्या अध्यक्षांचा दौरा यामुळे कमोडिटी बाजारात ही मोठी उलथापालथ सुरू आहे.
सोन्याचे नवे दर काय? (सोर्स - गुड रिटर्न्स)
| शहर | 24 कॅरेट सोन्याचा भाव | 22 कॅरेट सोन्याचा भाव | 18 कॅरेट सोन्याचा भाव |
| दिल्ली | 1,53,590 | 1,40,800 | 1,15,230 |
| मुंबई | 1,53,980 | 1,41,150 | 1,15,490 |
| भोपाळ | 1,54,030 | 1,41,200 | 1,15,540 |
| हैदराबाद | 1,53,980 | 1,41,150 | 1,15,490 |
| चेन्नई | 1,53,810 | 1,40,990 | 1,17,690 |
| कोलकाता | 1,53,980 | 1,41,150 | 1,15,490 |
| बंगळुरू | 1,53,440 | 1,40,650 | 1,15,080 |
