वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ट्रम्प किंवा त्यांच्या सल्लागारांनी २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत तब्बल ३,७०० शेअर व्यवहार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अमेरिकन सरकारी धोरणांमुळे थेट प्रभावित होणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री झाल्याने हितसंबंधांच्या संघर्षाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या व्यवहारांमध्ये कोट्यवधी डॉलरची उलाढाल झाली असून, एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन, बोईंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री करण्यात आले. या कंपन्यांवर अमेरिकन सरकारची धोरणे, निर्यात नियम, संरक्षण करार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता नियमांचा थेट परिणाम होतो. अवघ्या ९० दिवसांत झालेली ही मोठी वाढ म्हणजे एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने चालवलेला ‘हेज फंड’ असल्याची टीका तज्ज्ञांनी केली आहे.
दररोज सरासरी ४० व्यवहार; वॉल स्ट्रीटलाही धक्का
जानेवारी ते मार्च या काळात ट्रम्प यांनी दररोज सरासरी ४० हून अधिक व्यवहार केल्याचे समोर आले आहे. याआधीच्या तिमाहीत केवळ ३८० व्यवहारांची नोंद होती. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यांत व्यवहारांमध्ये झालेली प्रचंड वाढ वॉल स्ट्रीटलाही धक्का देणारी ठरली आहे.
माझ्या ४० वर्षांच्या वॉल स्ट्रीटवरील कारकिर्दीत एका विद्यमान राष्ट्राध्यक्षाने अशा पद्धतीने आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर शेअर्सचे व्यवहार केल्याचे मी कधीही पाहिलेले नाही. हे थक्क करणारे आहे, असे ‘द वेल्थ अलायन्स’चे एमडी एरिक डिटॉन यांनी म्हटले आहे.
हितसंबंधांच्या संघर्षावरून टीका
टीकाकारांच्या मते, राष्ट्राध्यक्ष पदावर असताना सरकारी निर्णयांमुळे प्रभावित होणाऱ्या कंपन्यांत इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार करणे नैतिकतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. ट्रम्प यांनी पूर्वीच्या अनेक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांप्रमाणे स्वतःचे व्यावसायिक हितसंबंध ‘ब्लाइंड ट्रस्ट’मध्ये पूर्णपणे हस्तांतरित केले नव्हते, ही बाबही पुन्हा चर्चेत आली आहे.
तंत्रज्ञान कंपन्यांत गुंतवणूक
ट्रम्प यांनी एनव्हिडिया, ओरेकल, मायक्रोसॉफ्ट, बोईंग आणि कॉस्टको यांसारख्या कंपन्यांमध्ये किमान दहा लाख डॉलरहून अधिक किमतीचे शेअर्स खरेदी केले. १० फेब्रुवारी रोजी मायक्रोसॉफ्ट, मेटा, ॲमेझॉनमधील ५० ते २५० दशलक्ष डॉलर मूल्याच्या गुंतवणुकीची विक्रीही करण्यात आली.
३,७०० व्यवहारांची एकूण किंमत २२० दशलक्ष डॉलर ते ७५० दशलक्ष डॉलर (जवळपास १८०० ते ६२०० कोटी रुपये) दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
आरोप फेटाळले
व्हाईट हाऊसने सर्व आरोप फेटाळून लावत, ट्रम्प अमेरिकन जनतेच्या हितासाठीच निर्णय घेतात, असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प ऑर्गनायझेशनने त्यांच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन स्वतंत्र वित्तीय संस्थांकडून केले जात असल्याचा दावा केला आहे.
