Dubai Luxury Hotel : नेहमीच झगमगाट आणि पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले दुबई शहर सध्या शांत पडले आहे. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्य-पूर्वेतील आकाशात युद्धजन्य ढग जमा झाले असून, त्याचा मोठा फटका दुबईच्या पर्यटन व्यवसायाला बसला आहे. सुरक्षिततेच्या चिंतेमुळे पर्यटकांनी दुबईकडे पाठ फिरवल्याने, जगातील सर्वात महागड्या समजल्या जाणाऱ्या 'फाइव्ह-स्टार' हॉटेल्सचे भाडे चक्क ५० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे.
'पाम जुमेराह'मध्ये दरांची मोठी घसरण
दुबईचा सर्वात पॉश भाग मानल्या जाणाऱ्या 'पाम जुमेराह' येथील अलिशान हॉटेल्समध्ये आतापर्यंत कधीही न मिळालेली सूट दिली जात आहे:
- पाच पाम जुमेराह : तीन रात्रींचे भाडे १,०१,८०८ रुपयांवरून थेट ६५,९७२ रुपयांवर आले आहे.
- मॅरियट रिसॉर्ट : येथे तीन रात्री मुक्कामासाठी आता केवळ ३७,७५६ रुपये मोजावे लागत आहेत.
- हिल्टन दुबई : या आलिशान प्रॉपर्टीत तीन रात्रींसाठी साधारण ४४,४९४ रुपयांचा दर सुरू आहे.
- ताज दुबई : बिझनेस बे मधील या हॉटेलमध्ये तीन रात्रींचा स्टे अवघ्या ३५,८३६ रुपयांत मिळत आहे.
प्रति रात्र ७,५०० रुपयांत मुक्काम!
तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता प्रीमियम हॉटेल्समध्ये एका रात्रीचा मुक्काम ७,५०० ते २२,००० रुपयांच्या दरम्यान पडत आहे. सामान्य काळात हेच दर दुप्पट किंवा तिप्पट असायचे. अनेक हॉटेलमध्ये केवळ २० टक्के खोल्या भरलेल्या आहेत, ज्यामुळे व्यवसायात मोठी मंदी आली आहे.
पर्यटकांच्या मनात भीतीचे सावट
दुबईने स्वतःला नेहमीच सुरक्षित 'हब' म्हणून सिद्ध केले आहे. मात्र, २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धानंतर इराणने खाडी देशांच्या दिशेने डागलेली क्षेपणास्त्रे आणि आकाशात विखुरलेले अवशेष यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हवाई क्षेत्र वारंवार बंद होणे आणि विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे 'शॉर्ट-टर्म' बुकिंग पूर्णपणे ठप्प झाली आहे.
वाचा - भारताचा ६० टक्के LPG पुरवठा धोक्यात; वाचा काय आहे सरकारची नवी रणनीती?
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ऑफर्स
हॉटेल उद्योग आता तोटा भरून काढण्यासाठी 'राहा आणि जेवा' सारख्या योजनांचा आधार घेत आहे. यामध्ये राहण्याचे भाडे जेवण किंवा स्पा सुविधांमध्ये समाविष्ट करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
