Crude Oil Supply: पश्चिम आशियातील वाढता संघर्षामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कतारमधून २० हजार टन LPG घेऊन निघालेले एक मालवाहू जहाज गुजरातच्या कांडला येथील दीनदयाल बंदरात सुरक्षितपणे पोहोचले आहे. बंदर अधिकाऱ्यांनी रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी मार्गांवर धोके वाढलेले असताना, या जहाजाचे सुरक्षित भारतात येणे देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. 'मार्शल आयलंड'चा ध्वज असलेले 'एमव्ही सिमी' हे जहाज कतारहून रवाना झाले होते. या जहाजाने १३ मे रोजी अत्यंत संवेदनशील मानलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' पार केली आणि शनिवारी(दि.१६) रात्री ११:३० च्या सुमारास कांडला बंदरात नांगर टाकले.
होर्मुझची सामुद्रधुनीत परिस्थिती जैसे थे...
ओमानच्या किनारपट्टीजवळ असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' हा जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहे. जगातील एकूण ऊर्जा पुरवठ्यापैकी (तेल आणि गॅस) सुमारे २० टक्के वाहतूक याच अरुंद सागरी मार्गावरून होते. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमालीचा वाढला आहे. या वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.
भारतासाठी हा मार्ग का आहे महत्त्वाचा?
भारत आपल्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. विशेष म्हणजे, भारतात येणारे इंधन आणि गॅस पश्चिम आशियातील देशांमधून आणि याच मार्गाने येते. त्यामुळेच या सागरी मार्गात कोणताही अडथळा आल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावर होऊ शकतो.
१३ भारतीय जहाजांचा यशस्वी प्रवास
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून आतापर्यंत भारताचे ध्वज असलेल्या १३ जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार केली आहे. यामध्ये १२ एलपीजी (LPG) टँकर आणि एका कच्च्या तेलाच्या (Crude Oil) जहाजाचा समावेश आहे.
भारताची संयुक्त राष्ट्रात (UN) तीव्र चिंता
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वथनेनी हरीश यांनी या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करणे हे कदापि खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सागरी मार्गांवर दळणवळणाचे स्वातंत्र्य राखणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भारतीय जहाजावर झाला होता हल्ला
दरम्यान, गेल्या १३ मे रोजी ओमानच्या किनारपट्टीजवळ भारतीय ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर हल्ला झाला होता. ओमानच्या सुरक्षा यंत्रणांनी तत्परता दाखवत जहाजावरील सर्व १४ कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका केली होती. मात्र, या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
