ठळक मुद्देधर्मेंद्र आणि शोभा तिथे पोहोचल्यावर सगळ्याच गोष्टी अतिशय अवघड झाल्या. हेमा यांच्या वडिलांनी चिडून धर्मेंद्र यांना बाहेर काढले. पण धर्मेंद्र कोणाचेच ऐकायला तयार नव्हते.

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे पती-पत्नी असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्या दोघांना इशा आणि आहाना अशा दोन मुली असून त्यांच्या इशा या मोठ्या मुलीने एक गोंडस मुलीला नुकताच जन्म दिला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेमकथा चांगलीच गाजली होती. धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झालेले होते आणि त्यांना अजेता, विजेता, सनी आणि बॉबी अशी चार मुलं होती. पण तरीही ते हेमा यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. हेमा यांनी एका विवाहित पुरुषासोबत लग्न करू नये अशी त्यांच्या कुटुंबियांची इच्छा होती.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या हेमा मालिनीः बियाँड द ड्रीम गर्ल या पुस्तकात धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केलेला आहे. धर्मेंद्र आणि हेमा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली होती. पण हेमा यांची आई जया चक्रवर्ती यांना याबद्दल कळले. त्यामुळे ते दोघे सेटवर अथवा बाहेर लपून छपून भेटत असत. एकदा हेमा संपूर्ण दिवसभर कुठे होत्या याची कल्पना त्यांच्या घरातल्यांना नव्हती. त्यामुळे जया यांनी त्यांच्यावर जास्तच लक्ष ठेवायला सुरुवात केली. हेमा यांच्यासाठी चांगला मुलगा शोधून त्यांचे लवकरात लवकर लग्न करून द्यावे असे त्यांना वाटत होते.

अभिनेते जितेंद्र हे आपल्या मुलीसाठी योग्य आहेत आणि जितेंद्र यांना देखील आपली मुलगी आवडते हे जया यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जितेंद्र आणि हेमा यांच्या लग्नाचा विचार केला. हेमा यांनी जितेंद्र यांच्या पालकांना भेटावे असे जया यांनी हेमाला सांगितले आणि आईच्या सांगण्यावरून त्या देखील जितेंद्र यांच्या पालकांना भेटायला तयार झाल्या. त्या दोघांचे लग्न लवकरात लवकर करावे असा विचार करून हेमा आणि त्यांचे कुटुंबीय, जितेंद्र आणि त्यांचे कुटुंबिय मद्रासला रवाना झाले. ही गोष्ट त्यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. पण तरीही ही गोष्ट मीडियामध्ये पसरली आणि धर्मेंद्र यांना याबाबत कळले. त्यांनी लगेचच ही गोष्ट जितेंद्र यांची प्रेयसी शोभा सिप्पी यांना सांगितली आणि ते दोघेही मद्रासला रवाना झाले. 

धर्मेंद्र आणि शोभा तिथे पोहोचल्यावर सगळ्याच गोष्टी अतिशय अवघड झाल्या. हेमा यांच्या वडिलांनी चिडून धर्मेंद्र यांना बाहेर काढले. पण धर्मेंद्र कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. अखेर हेमा यांच्यासोबत त्यांना एकांतात बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी हेमा आणि जितेंद्र यांच्या कुटुंबातील मंडळी, स्वतः जितेंद्र सगळेच रूमच्या बाहेर उभे होते. हेमा यांनी जितेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याची चूक करू नये अशी विनंती धर्मेंद्र त्यांना करत होते. अखेरीस हेमा यांनी रूमच्या बाहेर येऊन सगळ्यांना जितेंद्र आणि त्यांच्या लग्नासाठी काही दिवस थांबण्याची विनंती केली. पण हा जितेंद्र यांच्यासाठी अपमान होता. त्यांचे पालक देखील प्रचंड चिडले होते. सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ते लगेचच तिथून निघून गेले. 

काही काळानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले तर जितेंद्र शोभा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे जितेंद्र यांच्या लग्नाला धर्मेंद्र यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

Web Title: When A Dharmendra Arrived At Hema's Forceful Wedding To Jeetendra And Created 'Tamasha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.