बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले असून त्यांची निर्मिती असलेला ‘९९ साँग्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अभिनेता इहान भट बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


ए. आर. रेहमान यांनी आपल्या संगीताने रसिकांना भुरळ पाडल्यानंतर आता ते निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. त्यांनी ‘९९ साँग्स’ चित्रपटासाठी जीओ स्टुडिओसोबत हातमिळवणी केली आहे. ‘९९ साँग्स’ या चित्रपटात प्रेक्षकांना प्रेमकथा पहायला मिळणार आहे. 


अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, इहानने या चित्रपटात संगीतकाराची भूमिका साकारली असून त्याला या भूमिकेसाठी तयार करण्यासाठी ए.आर. रेहमान यांना खूप मेहनत घ्यावी लागली. शेकडो लोकांच्या ऑडिशनमधून इहानची निवड करण्यात आली आहे. गेल्या एक वर्षांपासून इहान चेन्नईत रेहमान यांच्यासोबत राहून पियानो वाजवायला शिकला. मुंबईत वॉईस ट्रेनिंग घेतली. याशिवाय अमेरिकेत अभिनयाचे धडे गिरविले.


इहान भट याबद्दल सांगतो की, अशाप्रकारच्या लाँचिंगबद्दल नवीन कलाकार फक्त विचार करू शकतात. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. कारण या सिनेमासाठी मला ए.आर. रेहमान सरांनी निवडले. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळाले.

 एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोईरालादेखील झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वेश कृष्णमूर्ती करत आहेत. ए. आर. रेहमान यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली आहे.

हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून हा चित्रपट २१ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 


Web Title: This new face will be seen in A.R. Rehman's 99 Songs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.