ठळक मुद्देया चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्माते विचार करत असून त्यांनी या चित्रपटाच्या प्लानिंगला सुरुवात देखील केली आहे. या चित्रपटाचे अनेक भाग येणार असून या चित्रपटाची फ्रेंचाईजी बनवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 

एखादा चित्रपट हिट झाला की, त्या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा विचार सुरू होतो. पण पागलपंती हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच या चित्रपटाच्या सिक्वलच्या तयारीला सुरुवात झाली असल्याचे म्हटले जात आहे. जॉन अब्राहमचा रोमिओ अकबर वॉल्टर म्हणजेच रॉ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात त्याने एक गंभीर भूमिका साकारली असली तरी याआधीच्या गरम मसाला, दोस्ताना यांसारख्या अनेक चित्रपटात त्याने हलक्या फुलक्या भूमिका साकारल्या आहेत. आता त्याचा पागलपंती हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पागलपंती या चित्रपटात त्याच्यासोबतच अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे अनिलचा कॉमिक अंदाज प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात या दोघांसोबतच इलियाना डिक्रूज, अर्शद वारसी, कृती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. पण काही कारणास्तव या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली असून आता हा चित्रपट 22 नोव्हेंबरलाच प्रदर्शित होणार आहे. 

पागलपंती या चित्रपटाचे चित्रीकरण फेब्रुवारीमध्ये लंडनला सुरू झाले होते. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करून टीम भारतात परतली असून दोन गाण्यांचे चित्रीकरण शिल्लक आहे.  या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण लंडन मध्ये झाले असून आता या चित्रपटाची टीम सध्या पोस्ट प्रोडक्शनच्या कामात व्यग्र आहे. पण या सगळ्यात आता या चित्रपटाच्या सिक्वलची बातमी आली आहे. इनखबर या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचा सिक्वल बनवण्याचा निर्माते विचार करत असून त्यांनी या चित्रपटाच्या प्लानिंगला सुरुवात देखील केली आहे. या चित्रपटाच्या सिक्वलच्या कथेवर सध्या काम सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाचे अनेक भाग येणार असून या चित्रपटाची फ्रेंचाईजी बनवण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 

पागलपंती या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत, अभिषेक पाठक आणि भुषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 

Web Title: John Abraham and Anil Kapoor’s Pagalpanti to have a sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.