मीना कुमारी व कमाल अमरोहींची प्रेमकहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर, इतका असेल बजेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 12:50 PM2022-01-17T12:50:13+5:302022-01-17T12:52:37+5:30

Kamal Amrohi-Meena Kumari love story : बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रेमकथा गाजल्या. मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांची प्रेम कहाणीही अशीच.

film on the kamal amrohi and meena kumari love story kamal amrohi son revealed | मीना कुमारी व कमाल अमरोहींची प्रेमकहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर, इतका असेल बजेट

मीना कुमारी व कमाल अमरोहींची प्रेमकहाणी लवकरच मोठ्या पडद्यावर, इतका असेल बजेट

Next

बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक प्रेमकथा गाजल्या. मीना कुमारी ( Meena Kumari )  आणि कमाल अमरोही ( Kamal Amrohi) यांची प्रेम कहाणीही अशीच. आज (17 जानेवारी) कमाल अमरोही यांची 104 वी जयंती. या प्रसंगी कमाल अमरोही यांचा मुलगा ताजदार अमरोही यांनी एक मोठी घोषणा केली आहे. होय, मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्या प्रेमकहाणीवर चित्रपट बनवण्याची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाचा बजेट सुमारे 200 कोटी असणार आहे.

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत ताजदार अमरोही यांनी सांगितलं की, ‘माझे वडील कमाल अमरोही यांचा जन्म 17 जानेवारी 1918 रोजी झाला होता. त्यांचं निधन झालं तेव्हा मी 8 वर्षांचा होतो.’

हिंदी सिनेमा गीतकार, पटकथालेखक आणि संवाद लेखक अशी कमाल अमरोही यांची ओळख होती.  कमाल अमरोही यांनी आपल्या अख्ख्या फिल्मी करिअरमध्ये केवळ पाच चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. यापैकी एक होता, ‘पाकिजा’. मीना कुमारीच्या अभिनयानं सजलेल्या ‘पाकिजा’कडे एक चित्रपट म्हणून नव्हे तर एक अमर कलाकृती म्हणून बघितलं जातं. पण हीच अमर कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली होती. होय, 1958 साली या चित्रपटाचं शूटींग सुरु झालं आणि 1972  मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला.  याचं मुख्य कारण होतं कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली ‘पाकिजा’ची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतरचा तलाक.

अशी सुरू झाली होती मीना कुमारी व कमाल अमरोही यांची प्रेमकहाणी
कमाल यांनी 16 वर्षांच्या मीना कुमारीला ‘महल’ या सिनेमात संधीच दिली नाही तर तिला सुपरस्टार ही ओळखही मिळवून दिली. पुढे मीना कुमारी कमाल अमरोही यांच्या प्रेमात जणू वेडी झाली होती. 

ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली तर मोसंबीच्या ज्युसने. होय, मीना कुमारी एका दुर्घटनेत गंभीर जखमी झाली आणि तिला रूग्णालयात भरती करण्यात आलं जखमी मीना कुमारीला पाहायला कमाल अमरोही रूग्णालयात पोहोचले. यावेळी मीना कुमारीच्या लहान बहिणीने तिची कमाल यांच्याकडे तक्रार केली. आपा तो मोसंबी का ज्यूस नहीं पी रहीं है, असं बहिण  म्हणाली. यावर कमाल यांनी केवळ नजर वर करून मीना कुमारीकडे पाहिलं आणि काय कमाल, मीना कुमारीनं एका घोटात मोसंबीचा ज्यूस संपवला. यानंतर कमाल दर आठवड्याला  मीना कुमारीला भेटायला येऊ लागले. इथून या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.


 
कमाल यांची आधीच दोन लग्नं झाली होती. ते तीन मुलांचे बाप होते. अशात मीना कुमारी व त्यांचं नातं मीनाच्या वडिलांना मान्य नव्हतं. पण मीना कुमारीला जगाची पर्वा नव्हती. त्या अपघातानंतर मीना कुमारी आपल्या बहिणीसोबत रोज एका मसाज क्लिनिकमध्ये जायची. 14 फेब्रुवारी 1952 रोजी दोघी बहिणींना वडिलांनी क्लिनिकमध्ये सोडून दिलं. पण मीना कुमारी तिथून थेट कमाल अमरोहींजवळ पोहोचली. काजी आधीच तयार होता. अगदी दोन तासांत दोघांचा निकाह झाला. अर्थात 1964 येईपर्यंत हे जोडपे विभक्त झालं होतं. त्यांच्यातील मतभेद टोकाला पोहोचले होते.
 कमाल अमरोही यांच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता. अशावेळी मीना कुमारी त्यांच्या प्रेमात पडली होती.  कमाल अमरोही हे  जिद्दी, जातिवंत कलाकार होते. त्यांच्या कामात कोणी लुडबूड केलेली त्यांना अजिबात सहन होत नसे.   कमाल अमरोहींनी त्यांची पहिली पत्नी आणि मुलांना गावी पाठवून मीनाकुमारीसोबत संसार सुरु केला.

सुरुवातीची काही वर्षे सुखाची गेली. पण नंतर कमाल यांच्या तापट स्वभावामुळे  त्यांना चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळेनासे झालं. याऊलट   मीनाकुमारी यशाच्या पाय-या चढू लागली. यातच मीनाकुमारीचं स्वच्छंदी वर्तन त्यांच्यातील वादाला कारण ठरू लागलं. प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मीनाकुमारीला यश खुणावत होतं.  यातच तिला दारूचं व्यसन जडलं. कमाल अमरोहींची बंधनं तिला नकोशी वाटू लागली आणि एक दिवस कमाल अमरोहीचा सोन्याचा पिंजरा सोडून ती बाहेर पडली.  यामुळे  ‘पाकिजा’ चित्रपट अर्धवट राहिला होता. दोघंही एकमेकांसोबत काम करण्यास तयार नसताना सुनील दत्त व नर्गिस यांनी दोघांना कसंबसं राजी केलं आणि नाखुशीने का होईना कमाल व मीना कुमारी यांनी ‘पाकिजा’ पूर्ण केला.   31 मार्च1972 रोजी मीना कुमारीनं  जगाचा निरोप घेतला. तर 11 फेब्रुवारी 1993 मध्ये कमाल अमरोही यांनीही जगाला अलविदा म्हटलं.

Web Title: film on the kamal amrohi and meena kumari love story kamal amrohi son revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app