ठळक मुद्देजितेंद्र यांचा शोभा कपूर यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नाच्या आधी ते दोघे बराचकाळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र जितेंद्र एकदा हेमा मालिनी यांच्यासाठी शोभा कपूर यांच्यासोबतचे नातं तोडणार होते.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला. त्यांनी हमजोली, हिम्मतवाला, मवाली, संजोग, तोफा यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. या वयातही जितेंद्र प्रचंड फिट आहेत. जितेंद्र यांच्या आयुष्यातील अशा अनेक गोष्टी आहे ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खूप कमी लोकांना हे माहिती असेल जितेंद्र यांना हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करायचे होते. त्यासाठी जितेंद्र यांनी शोभा कपूर यांच्यासोबतचे नातं तोडले देखील होते.

जितेंद्र यांचा शोभा कपूर यांच्यासोबत विवाह झाला आहे. लग्नाच्या आधी ते दोघे बराचकाळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र जितेंद्र एकदा हेमा मालिनी यांच्यासाठी शोभा कपूर यांच्यासोबतचे नातं तोडणार होते. शोभा कपूर यांच्यासोबत जितेंद्र यांचा साखरपुडा झाला होता मात्र जितेंद्र यांच्या मनात हेमा मालिनी भरल्या होत्या. ज्यावेळी शोभा कपूर यांना ही गोष्ट कळली त्यावेळी त्या प्रचंड चिडल्या होत्या.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या हेमा मालिनीः बियाँड द ड्रीम गर्ल या पुस्तकात धर्मेंद्र आणि त्यांच्या प्रेमकथेचा उल्लेख केलेला आहे. धर्मेंद्र आणि हेमा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांनी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली होती. पण हेमा यांची आई जया चक्रवर्ती यांना याबद्दल कळले. त्यामुळे ते दोघे सेटवर अथवा बाहेर लपून छपून भेटत असत. एकदा हेमा संपूर्ण दिवसभर कुठे होत्या याची कल्पना त्यांच्या घरातल्यांना नव्हती. त्यामुळे जया यांनी त्यांच्यावर जास्तच लक्ष ठेवायला सुरुवात केली. हेमा यांच्यासाठी चांगला मुलगा शोधून त्यांचे लवकरात लवकर लग्न करून द्यावे असे त्यांना वाटत होते. त्यांनी जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे लग्न करायचे ठरवले. या गोष्टीसाठी जितेंद्र यांनी देखील होकार दिला आणि लग्न चेन्नईमध्ये करायचे ठरले.

धर्मेंद्र आणि शोभा यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते थेट चेन्नईला पोहोचले. ते दोघे तिथे गेल्यावर सगळ्याच गोष्टी अतिशय अवघड झाल्या. हेमा यांच्या वडिलांनी चिडून धर्मेंद्र यांना बाहेर काढले. पण धर्मेंद्र कोणाचेच ऐकायला तयार नव्हते. अखेर हेमा यांच्यासोबत त्यांना एकांतात बोलण्याची परवानगी देण्यात आली. त्यावेळी हेमा आणि जितेंद्र यांच्या कुटुंबातील मंडळी, स्वतः जितेंद्र सगळेच रूमच्या बाहेर उभे होते. हेमा यांनी जितेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याची चूक करू नये अशी विनंती धर्मेंद्र त्यांना करत होते. अखेरीस हेमा यांनी रूमच्या बाहेर येऊन सगळ्यांना जितेंद्र आणि त्यांच्या लग्नासाठी काही दिवस थांबण्याची विनंती केली. पण हा जितेंद्र यांच्यासाठी अपमान होता. त्यांचे पालक देखील प्रचंड चिडले होते. सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ते लगेचच तिथून निघून गेले.

काही काळानंतर धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केले तर जितेंद्र शोभा यांच्यासोबत विवाहबंधनात अडकले. विशेष म्हणजे जितेंद्र यांच्या लग्नाला धर्मेंद्र यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती.

Web Title: Did you know that Hema Malini and Jeetendra almost got married? PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.