bollywood celebrities pay tribute to arun jaitley | बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

ठळक मुद्देअभिनेता आणि खासदार सनी देओलने ट्वीट केले आहे की, देशाने आज आणखी एक चांगला नेता गमावला. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत.

नोटाबंदी आणि जीएसटी यांसारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने 9 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एम्स रुग्णालयामार्फत पत्रक जारी करून अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12.07 मिनिटांनी जेटलींनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्सनी ट्विटरच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता रितेश देशमुखने ट्वीट करत लिहिले आहे की, अरुण जेटली यांच्या निधनामुळे मला अतिशय दुःख झाले आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. 

दिग्दर्शक - निर्माता करण जोहरने म्हटले आहे की, आज देशाने एक चांगला नेता गमावला आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. 

अभिनेत्री निर्मत कौरने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जेटली यांना भेटण्याची मला कधी संधी मिळाली नाही. पण त्यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले, त्याच कॉलेजमध्ये मला शिक्षण घेता आले हे माझे भाग्य आहे. त्यांनी देशासाठी केलेले योगदान हे कधीही न विसरणारे आहे.  

अभिनेता आणि खासदार सनी देओलने ट्वीट केले आहे की, देशाने आज आणखी एक चांगला नेता गमावला. माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. 

गायक अदनान सामीने ट्वीट करत लिहिले आहे की, अरुण जेटली यांच्या निधनाच्या बातमीने मला खूप वाईट वाटले. ते खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो... 

Web Title: bollywood celebrities pay tribute to arun jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.