ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांनी बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले असून शेतकऱ्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे.

अमिताभ बच्चन यांना सदी का महानायक असे म्हटले जाते. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत. अमिताभ यांचे फॅन फॉलोव्हिंग प्रचंड असून त्यांच्या फॅनना त्यांच्याविषयी जाणून घ्यायला नेहमीच आवडते. अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या या प्रवासामुळे प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. पण त्याचसोबत त्यांनी मान, सन्मान, पैसा देखील मोठ्या प्रमाणावर कमावला आहे.

अमिताभ बच्चन नेहमीच समाजकार्य करण्यासाठी पुढाकार घेतात. ते विविध सामाजिक कार्यांसाठी मदत करत असतात. आता त्यांनी एक खूप चांगले कार्य केले असून याविषयी आपल्या ब्लॉगमधून आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील २१०० शेतकऱ्यांचे कर्ज फेडले असून शेतकऱ्यांना मोठ्या संकटातून बाहेर काढले आहे.

अमिताभ बच्चन यांनी याआधी देखील अनेक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे. याविषयी अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, बिहारमधील अनेक शेतकऱ्यांवर मोठ्या रकमांची कर्जं होती. त्यामुळे वन टाइम सेटलमेंट करून २१०० शेतकऱ्यांची कर्जं फेडण्यात आली आहेत. यामधील काही शेतकऱ्यांना माझ्या जनक या बंगल्यावर बोलावण्यात आले होते. त्यांना अभिषेक आणि श्वेता यांच्या हातून चेक देण्यात आले.

शेतकऱ्यांची कर्जं फेडण्याचे वचन अमिताभ यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते आणि त्यांनी हे वचन पूर्ण देखील केले. अमिताभ बच्चन यांनी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात देखील उत्तर प्रदेशमधील १३४८ शेतकऱ्यांच्या कर्जांचे पैसे भरले होते. त्यावेळी त्यांनी चार कोटीहून अधिक रकमेचे कर्ज फेडले होते. तसेच महाराष्ट्रामधील ३५० शेतकऱ्यांचे कर्ज देखील अमिताभ यांनी फेडले होते.

अमिताभ यांनी शेतकऱ्यांनाच नव्हे तर सैनिकांना देखील मदत केली आहे. त्यांनी शहिद झालेल्या ४४ सैनिकांच्या कुटुंबाना आर्थिक मदत केली होती. त्यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, सैनिक आपल्यासाठीच त्यांच्या जीवाची बाजी लावतात. त्यामुळे आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांच्या कुटुंबासाठी मला काहीतरी करता आले याचे मला समाधान वाटत आहे. 


Web Title: Amitabh Bachchan Pays Off Loans Of 2,100 Farmers From Bihar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.