Maharashtra Election 2019 : Voters discourage in Bhandara Assembly constituency | Maharashtra Election 2019 : भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांचा निरुत्साह
Maharashtra Election 2019 : भंडारा विधानसभा क्षेत्रात मतदारांचा निरुत्साह

ठळक मुद्दे५ वाजेपर्यंत ६० टक्के मतदान : पोलिसांचा चोख बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र दिवसभरातील हालचालीनंतर मतदारांचा निरुत्साहच जाणवला गेला. उमेदवारांच्या बुथ केंद्रावर उत्साह दिसत असला तरी ज्याप्रमाणे मतदारांची भूमिका मतदानासाठी दिसून यायला हवी होती तसला प्रकार दिसून आला नाही. या क्षेत्रात जवळपास ६५ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक नोंद मिळाली.
सकाळी ७ वाजता भंडारा विधानसभा क्षेत्रातील भंडारा व पवनी तालुक्यात मतदानाला प्रारंभ झाला. सकाळसत्रात मतदारांचा उत्साह दिसून येईल अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही. सकाळी ११ वाजतापर्यंत भंडारा विधानसभा क्षेत्रात फक्त १७.२० टक्के मतदान झाले होते. भंडारा विधानसभा क्षेत्रात तीन लक्ष ७० हजार ५७४ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ८५ हजार १४६ तर, महिला मतदारांची संख्या १ लक्ष ८५ हजार ४२८ इतकी आहे.
दुपारसत्रातही मतदारांचा हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. दुपारी १ वाजतापर्यंत भंडारा व पवनी तालुका मिळून फक्त २७.२० टक्के मतांची नोंदणी करण्यात आली. ३ वाजतापर्यंत यात काही प्रमाणात आशावाद जाणवला. मतांची टक्केवारी २१ टक्क्यांनी वाढली. ही टक्केवारी ४७.५२ इतकी होती.
उमेदवारांच्या बुथ केंद्रांवर मतदारांची नावे पाहून देणाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली. मात्र अपेक्षानुरुप मतदारांची संख्या मतदान केंद्रांवर अल्प होती. दिवसभराच्या हालचालींवर लक्ष घातले असता जवळपास एक तासापर्यंत काही केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृती केली असतानाही लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा व्यक्त केली होती. मात्र हा दावा फोल ठरल्याचे सायंकाळपर्यंत स्पष्ट होत गेले.

ज्येष्ठ नागरिकांचे स्वयंस्फूर्तीने मतदान
दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा शहरासह ग्रामीण क्षेत्रात रिमझिम पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रात जाणे टाळले. काही ठिकाणी वृद्ध नागरीक मतदानासाठी स्वयंस्फूर्तीने जाताना आढळले. छत्री घेऊन मतदार मतदान केंद्राकडे जाताना दिसले. पावसामुळे जवळपास अर्धा ते पाऊण तास मतदान प्रक्रियेत खोळंबा निर्माण झाला.
दुपारनंतर मतदारांच्या रांगा
भंडारा विधानसभा क्षेत्रात दुपारपर्यत मतदानात पाहिजे त्या प्रमाणात उत्साह दिसून आला नाही. मात्र दुपारी ३ वाजताच्यानंतर मतदारांनी आपल्या हक्काचा उपयोग केला. सायंकाळी ४.३० ते ६ वाजतापर्यंत काही केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. केंद्र परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही. राज्य राखीव दल तसेच जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे चोख व्यवस्था लावण्यात आली होती.ठिकठिकाणी पोलिसांची गस्त सुरु होती.

Web Title: Maharashtra Election 2019 : Voters discourage in Bhandara Assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.