बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:32 IST2024-12-12T15:32:03+5:302024-12-12T15:32:41+5:30

Dhananjay Munde: गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे, अशी भूमिकाही धनंजय मुंडे यांनी मांडली आहे.

Beed ncp leader and mla Dhananjay Munde finally breaks silence on kej Sarpanch santosh deshmukh murder case | बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले...

बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अखेर धनंजय मुंडेंनी सोडले मौन; म्हणाले...

Beed Murder Case ( Marathi News ) :केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी निर्घृण हत्या करण्यात आली. पाच ते सहा जणांनी देशमुख यांना बेदम मारहाण करत त्यांचा खून केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींवर तात्काळ कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार आणि बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणावर आपली भूमिका मांडत आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, असं मत व्यक्त केलं आहे. 

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची दोन दिवसांपूर्वी अपहरण व हत्या झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य कार्यवाही करून दोषींना कडक शासन करावे. स्व. संतोष देशमुख यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. या घटनेच्या आडून कुणीही राजकारण साधण्याचे किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करू नये अशी माझी हात जोडून विनंती आहे," असं आवाहन मुंडे यांनी केलं आहे.

दरम्यान, गुन्हेगारी ही विकृती आहे आणि विकृतीला कठोर शिक्षा ही व्हायलाच पाहिजे, या मताचा मी आहे, अशी भूमिकाही धनंजय मुंडे यांनी मांडली आहे.

नेमकं काय घडलं?

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान केज येथून मस्साजोगकडे जीपमधून ( क्रमांक एम एच ४४ / बी ३२३० ) निघाले. उमरी शिवरातील टोल नाक्याजवळ पाच ते सहा जणांनी त्यांची जीप अडविली. गाडीच्या काचा फोडून सरपंच संतोष देशमुख यांना बाहेर काढत काठीने मारहाण करून अपहरण केले. मारकऱ्यांच्या दोन जीप देशमुख यांना घेऊन केजच्या दिशेने गेल्या. त्यानंतर जीपचालक शिवराज देशमुखने केज पोलीस ठाणे गाठून  सरपंच संतोष देशमुख यांचे अज्ञात ६ जणांनी मारहाण करत अपहरण केल्याची फिर्याद दिली. गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी तातडीने दोन पथकांची स्थापना करून तपासाचे आदेश दिले. 

दरम्यान, सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बोरगाव दैठना या रस्त्यावर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 

Web Title: Beed ncp leader and mla Dhananjay Munde finally breaks silence on kej Sarpanch santosh deshmukh murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.