विदर्भातील ज्योतिषांचे भाकीत ठरले फोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:58 IST2024-06-05T15:56:58+5:302024-06-05T15:58:06+5:30
Amravati Lok Sabha Results 2024 : अनपेक्षित निकाल

Vidarbha astrologer's prediction failed
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे: लोकसभेच्या निवडणुकीत रिंगणात असलेल्या विदर्भातील उमेदवारांमध्ये आपलाच विजय होणार, अशी कुंडली काढणारे ज्योतिष आजच्या अनपेक्षित निवडणुकीच्या निकालात फेल ठरले. यातील विजयाचे दावे सांगणाऱ्या काही ज्योतिषांनी महाराष्ट्राबाहेर पळ काढला आहे.
विदर्भात दोन टप्प्यांत निवडणूक पार पडली. दहा जागांसाठी तब्बल दोनशेच्या अधिक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. यातील नागपूर, रामटेक, गोंदिया भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ-वाशिम, चंद्रपूर, वर्धा या मतदारसंघांतील उमेदवारांनी आपले नशीब भविष्यकारांकडे अजमावले होते. ज्योतिषकारांनी या उमेदवारांची जन्मतारीख, जन्मठिकाण, जन्मदात्याचे नाव यावरून कुंडली तयार केली होती. एक महिन्यात या उमेदवारांना पूजा, हवन, तसेच जन्मराशीप्रमाणे ग्रह राशीचे पूजन करण्याचे सांगितले होते. विशेषतः काही उमेदवारांना शनी, मंगळ उद्धट, युनेरस विक्षिप्त, चंद्र खारट आणि गुरू गोड असल्याचे भाकीत सांगून अनेक राशीचे खडे बोटात टाकायला या ज्योतिषकारांनी सांगितले.
एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक देवी-दैवतांचे नवस फेडण्याचे या भविष्यकारांनी सांगून लाखो रुपयांची रक्कम उमेदवाराकडून आपल्या जन्मकुंडलीच्या पिशवीत टाकल्याची माहिती आहे; परंतु मंगळवारी लागलेल्या निकालात विदर्भातील दहा जागांवरील या उमेदवारांची पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत मते माघारल्याने या ज्योतिषांनी विदर्भाबाहेर पळ काढल्याचे वृत्त आहे. उमेदवारांचा फोन येण्यापूर्वी या ज्योतिषांनी मोबाइल स्वीच ऑफ करून नागपूर येथून रेल्वे प्रवासी गाडी पकडून तीर्थस्थळाला जाणे पसंत केले.