२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 04:03 PM2024-04-12T16:03:31+5:302024-04-12T16:05:17+5:30

ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात अशी टीका आशिष शेलारांनी केली.

Lok Sabha Elections - BJP leader Ashish Shelar targets Uddhav Thackeray and Aditya Thackeray | २०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

२०१४ च्या निवडणुकीत युती आदित्य ठाकरेंमुळे तुटली; भाजपा नेते आशिष शेलारांचा दावा

मुंबई - Ashish Shelar on Uddhav Thackeray ( Marathi News ) २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती ही आदित्य ठाकरेंमुळे तुटली. आदित्य ठाकरेंनी मिशन १५० ची घोषणा केली. कुठलीही चर्चा नाही, मग १५१ आले कुठून? त्यावेळी आम्ही वेगळे लढलो. त्यानंतर २०१७ महापालिका निवडणुकीतही अहंकारी पिता पुत्रांनी आम्ही युतीत सडलो असं विधान केले. त्यानंतर दोन्ही निवडणुकीत शिवसेना आमच्याशिवाय लढली तेव्हा जिंकू शकली नाही असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी लगावला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेतही शिवसेनेचा पराभव झाला, २०१४ मध्ये भाजपाचे १०० हून अधिक आमदार निवडून आले. महापालिकेतही ८४-८२ असे नगरसेवक आले. पण एकहाती सत्ता उद्धव ठाकरेंना घेता आली नाही. बोलायला जीएसटी लागत नाही. उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरेंची भाषणे महाराष्ट्र हित, देशहिताची नाहीत. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती युवकांसाठी, शैक्षणिक भविष्यासाठी आहे तसं उद्धव ठाकरेंचं नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच ज्यावेळी उद्धव ठाकरेंकडे बोलण्यासारखं नाही तेव्हा ते भावनात्मक भाषणं करतात. एकनाथ शिंदेंना उचित स्थान दिले असते तर शिवसेना फुटली नसती. मुख्यमंत्रिपदाच्या मोहात उद्धव ठाकरे अडकले त्यामुळे शिवसेना फुटली. आम्ही उद्धव ठाकरेंवर आंधळा विश्वास ठेवला. देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण विश्वास ठेवला, मित्राने धोका दिला त्यापेक्षा आपलेच चुकले असं आम्ही म्हणू. बंद खोलीत कोण काय बोलले हे दोघेच सांगू शकतात. अमित शाह यांनी कुठलेही आश्वासन दिले नव्हते. त्याचसोबत प्रत्येक भाषणात देवेंद्र फडणवीसांचं सरकार पुन्हा येईल असं म्हणत होते. उद्धव ठाकरेंकडे कुठलाही पुरावा नाही असंही आशिष शेलार यांनी म्हटलं. एबीपीच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, आता उद्धव ठाकरेंसाठी आमचे दरवाजे बंद आहेत. ही परिस्थिती त्यांनी ओढावून घेतली आहे. शरद पवारांनी याआधी २ वेळा आमच्याशी चर्चा करून फसवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यापुढे त्यांच्यावर भरवसा ठेवणं कठीण आहे. २०१७-१८ मध्ये स्वत: शरद पवार अमित शाहांना भेटले, शिवसेनेला सोडून माझ्यासोबत सरकार बनवा हा त्यांचा आग्रह होता. परंतु आम्ही उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवला. २०२१ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लावताना शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. आता ते काहीही म्हणो असंही आशिष शेलारांनी सांगितले.  

राज ठाकरेसोबत आले त्याचा आनंद

मिशन ४५ प्लस हे महायुतीचं ध्येय आहे. अहंकारी आदित्य ठाकरेंसारखं एका पक्षानं घोषित केलेला निर्णय नाही. शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी आणि इतर मित्रपक्ष यांच्यासोबतीनं मिशन ४५ प्लस साकार करणार आहोत. मोदी परिवार वाढवताना राज ठाकरेंसारखा चांगला सहकारी मित्र मिळत असेल तर निश्चितच त्याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंसोबत चर्चेत देवेंद्र फडणवीस आहेत. राज ठाकरेंच्या मनसेनं आमच्यासोबत निवडणूक लढली तर ते मला व्यक्तिगत आवडेल. पण सध्या मी चर्चेत नाही. राज ठाकरे प्रचारात दिसतील अशी अपेक्षा आहे असं शेलारांनी म्हटलं. 

उमेदवारी घोषित न होण्यामागे रणनीती 

उमेदवार घोषित न होण्यामागं आमच्या रणनीतीचा तो भाग आहे. माझ्यासहित कोअर कमिटीनं पूनम महाजन यांना तिकीट दिले पाहिजे असं मत मांडलं आहे. आता केंद्रीय नेतृत्व जो निर्णय करेल ते पाहू. मी विधानसभेत खुश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला जिंकवणं हे मोठं चॅलेंज आहे. ते मी करेन. दक्षिण मुंबईच्या जागेबाबत जिंकण्यासाठी योग्य उमेदवार आणि पक्ष कोण याचं मूल्यमापन सुरू आहे. लोकशाहीत अशी चर्चा होते तेव्हा त्याचे स्वागत केले पाहिजे. प्रक्रियेत संवाद आहेत, वाद नाही. निर्णय करताना तो जिंकण्यासाठीचा असावा. त्यासाठी वेळ घातला जातोय. ही रणनीती आहे असं आशिष शेलारांनी सांगितले. 
 

Web Title: Lok Sabha Elections - BJP leader Ashish Shelar targets Uddhav Thackeray and Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.